- खासदार प्रतिभा धानोरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील अनुकंपा तत्त्वावर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. आज (शुक्रवार, १४ जून) त्यांनी पत्र क्रमांक ५४३/२०२५ द्वारे ही मागणी करत या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली.
. पत्रात खासदार धानोरकर यांनी नमूद केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, पण प्रत्यक्ष सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणे अपेक्षित असूनही, शासन निर्णयात त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
. याच पार्श्वभूमीवर अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी वरोरा येथे खासदार धानोरकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे आदी उपस्थित होते.
. खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले की, २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात अशा कर्मचाऱ्यांचा विचारच करण्यात आलेला नाही, जे केंद्र शासनाच्या धोरणानुसार जुनी पेन्शन घेण्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील केंद्राप्रमाणे धोरण ठरवून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
. “अनुकंपा तत्त्वावर निवड होऊनही फक्त रुजू होण्याची तारीख १ नोव्हेंबर २००५ नंतर असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाकारली जात आहे, जे पूर्णपणे अन्यायकारक आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले.


