चक्क ‘घोरपड’ पोहोचली न्यायालयात

9

जिल्हा ग्राहक न्यायालयातील घटना

घोरपड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

चंद्रपूर : सध्या उन्हाळा चांगलाच तापत आहे. जलाशय व तलाव आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी शहरी भागाकडे वळावं लागत आहे. अशाच एका घटनेत आज चंद्रपूर जिल्हा ग्राहक न्यायालयात एका घोरपडीने बस्तान मांडल्याने एकच तारांबळ उडाली.या अनोख्या पाहुण्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनी कौतुकाने घोरपड पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे न्यायालयात घोरपड ची चर्चा सर्वत्र रंगली.

.      चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच ग्राहक न्यायालय कार्यालय आहे. तिथे तहानलेल्या व थकलेल्या घोरपडीने पाणी पिऊन तहान भागवली. तहान भागविल्यानंतर ही घोरपड तिथेच चकरा मारत होती. काही वेळाने न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घोरपड दिसली. न्यायालयात घोरपड आल्याची चर्चा सुरू झाली काही वेळाने न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभाग आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना दिली. यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या इको-प्रोच्या वन्यजीव मित्रांनी घोरपडीला काळजीपूर्वक पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे निसर्गमुक्त केले. सुदैवाने कोणतीही हानी न होता घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी इको-प्रो चे सदस्य कपिल चौधरी, सचिन धोतरे व आरआरयू चे वनकर्मचारी यांनी सहकार्य केले.