वरोरा : ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंतीनिमित्त येथील आनंद निकेतन महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वाचनकक्षात दि. 14 एप्रिल ला सकाळी 8 वाजतापासून रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सलग वाचन व अभ्यास अभियान व ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर -जीवन व कार्य’ यावरील ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
. अभियानाच्या प्रारंभी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अरविंद सवाने यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. अरविंद ढोके यांनी प्रस्तुत अभियानाच्या व ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजनाची भुमिका विषद करुन यथोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ग्रंथपाल डॉ. संजय साबळे, समन्वयक डॉ. सुधाकर पेटकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ महाविद्यालयात आयोजित केलेल्या या अभ्यास अभियानास सकाळपासून रात्रीपर्यंत एकुण 42 विद्यार्थी, 12 सहकारी प्राध्यापक व कर्मचारी अशा एकुण 54 वाचकांनी या अभिनव अशा सलग वाचन व अभ्यास अभियानात सहभाग घेतला. यात विविध वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, पाठ्यपुस्तके, संदर्भ व अवांतर पुस्तके आदि वाचन साहित्याचा विद्यार्थ्यांनी भरपुर लाभ घेतला. महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चहापान व अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
. या अभियानासोबत ग्रंथालयाच्या वाचन कक्षात दि. 14 ते 16 एप्रिल असे सलग तीन दिवसांच्या कालावधीत ज्ञानोपासक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावरील निवडक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रस्तुत प्रदर्शनासही महाविद्यालयातील विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त भेट दिली.
. सदर उपक्रमांच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. सुधाकर पेटकर, ग्रंथपाल डॉ. संजय साबळे तसेच ग्रंथालय कर्मचारी भुपेश साखरे, सुनिल चिमुरकर, अर्चना चव्हाण, प्रफुल्ल थुटे, मैनाबाई मगरे व ऋषीकेश वरभे यांनी विशेष परिश्रम घेतले.


