मराठी राज भाषा दिवस विशेष
. “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टीळा…” असे गौरवोद्गार आपल्या मातृभाषेबद्दल बोलले जाते, ते उगीच नव्हे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी अति प्राचीन असून समृद्ध, वैभव संपन्न आहे. मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासाचा मागोवा घेतल्यास २५०० वर्षापासूनचा इतिहास पाहावयास मिळतो. कवी मुकुंदराज, म्हाइंभट, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व इतर संत कवींनी व अनेक साहित्यिकांनी आपली साहित्य संपदा श्रेष्ठ अशा मराठी भाषेतूनच लिहून मराठी भाषेतील वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे .
. मराठी भाषा बोलणाऱ्यांचे राज्य म्हणून १मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मराठी भाषकांचे राज्य अस्तित्वात आले, हे आपणाला सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी राजभाषा अधिनियम १९६४ हा सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने प्रसिद्ध केला. १९६४ च्या अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा ही मराठी असेल अशे घोषित करण्यात आले. ह्या मराठी राजभाषा अधिनियम १९६४ च्या अधिनियमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सन १९६६ ला करण्यात आली. तेव्हापासूनच १ मे हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो.
. भारतातील महत्वपूर्ण २२ अधिकृत भाषांपैकी आपली मातृभाषा मराठी एक आहे. भारतात मराठी भाषिक लोकांचा विचार केला तर १४ कोटी लोकसंख्या ही मराठी भाषकांची आहे. जागतिक क्रमवारी मराठी भाषा ही १० व्या क्रमांकावर आहे. भारताचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी ही मराठी भाषाच आहे. मराठी भाषिक प्रदेशाचा विचार केला तर, भारतात त्याचा आवाका विस्तृत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक (बेळगाव) छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी अनेक प्रदेशात मराठी भाषिक लोक वास्तव्य करतात. जागतिकीकरणाच्या प्रभावाने आज भारतात तसेच भारताबाहेर अनेक देशांमध्ये ठिकाणी ठिकाणी मराठी भाषिक, मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येत विखुरलेले आहेत.
. महाराष्ट्रात मराठी भाषा ही राजभाषा असून महाराष्ट्र राज्याचा कारभार हा मराठी भाषेतूनच चालतो. भाषेच्या वैभवाचा विचार केला तर ज्या भाषेत बोलीभाषा आहेत, ती भाषा अधिक समृद्ध असते , असे अभ्यासक म्हणतात. मराठी भाषेच्या बोलीभाषांचा विचार केल्यास साधारणतः ८० बोलीभाषा आजतागायत आहेत. दर १२ मैलांवर बोली भाषेत स्थित्यंतर होताना दिसते. भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आहे. भाषा ही प्रवाही असते. भाषेला नदीची उपमा दिली तर, नदीत जसे विविध ओढे, नाले, ओहोळ, पाट इत्यादी येऊन मिसळतात व नदीचा पात्र समृद्ध भरून वाहतो. त्याप्रमाणेच आपल्या मातृभाषेचेही आहे. मराठी भाषेत अनेक बोलीभाषा आहेत. त्या सर्व बोलीभाषा मराठी भाषेला समृद्ध करण्याचे कार्य करत असतात. जागतिकीकरणाच्या प्रभावाने अनेक भाषांचा संपर्क येऊन मराठी भाषेत इतर भाषेतील तत्सम शब्द, अनेक शब्द प्रचलित झालेत. मराठी भाषेचा दैदिप्यमान इतिहास बघितल्यास १२ व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप, १६ व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप, १९ व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप व आज २१ व्या शतकातील मराठी भाषेत तुलनात्मक दृष्ट्या अनेक स्थित्यंतरे झालेले आहेत, हे आपल्या दृष्टीस येते.
. आज आपल्या मराठी भाषेतील अनेक बोलीभाषा या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ही चिंतनीय बाब आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महापराक्रमी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी स्वतंत्र कोष निर्माण करून खर्च केला. आपल्या मराठी भाषेला गौरव प्राप्त करून देण्यास्तव व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या मराठी भाषेतील साहित्यिक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४७ नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार राष्ट्रपतींना आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केले. २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
. अशा ह्या आपल्या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी व वैभव संपन्न करण्यासाठी मराठी भाषकांनी आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगण्याची आवश्यकता आहे. पण आपण मराठी मातृभाषिक मंडळी मात्र मराठी भाषा बोलताना न्यूनगंड बाळगतो व मराठी माणसासोबत दुसऱ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. हे खरे नव्हे काय? आपण महाराष्ट्रीयन जनसमुदायाने इतर राज्यांचा आदर्श घेऊन, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून, आपल्या व्यवहाराची भाषा ही मराठीच राहील असा आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. सध्या मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी अनेक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कॉन्व्हेन्ट संस्कृतीमुळे आज अनेक मराठी शाळा ओस पडत आहेत, नव्हे बंद पडत आहेत, ही चिंतनीय बाब आहे. अशातच महाराष्ट्र शासनाने १५ सप्टेंबर २०२४ ला एक परिपत्रक काढून इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी भाषा अनिवार्य केली. ह्या निर्णयाचे महाराष्ट्रीयन जनतेने स्वागतच केले. पण फक्त घोषणा केल्याने आपण हर्षित होऊन चालणार नाही. तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला शासनावर लक्ष ठेवून कार्य करावे लागेल.
. भारत सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ ला घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मराठी भाषेचा अभिजात घट स्थापन करून माय मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला . ही खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. यासाठी सर्व मराठी भाषिकांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, म्हणजे आपले कार्य संपुष्टात आले असे नव्हे. तर यापुढे आपल्या भाषेच्या वैभव संपन्न उन्नतीसाठी, प्रचार व प्रसारासाठी आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे . मराठी भाषा ही ज्ञानभाषा, व्यवहार भाषा, संपर्काची भाषा व्हावी व हे सर्व आपणालाच करावे लागेल. ते आपले कर्तव्य नव्हे काय ? आपण सर्व मराठी भाषिक सामान्य जनता ही मराठी भाषा उन्नतीसाठी एक चळवळ समजून प्रत्येक जण मराठीचा स्वाभिमान बाळगून, मराठीतूनच व्यवहार करेल हा आशावाद बाळगायला हवा. एवढेच नव्हे तर आपण माय मराठीच्या संवर्धनासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी कटिबद्ध होऊया. व माझ्या माय मराठीचा झेंडा अटकेपार रोवू या .
प्रा. डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार, महाराष्ट्ररत्न भद्रावती, उपाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य


