आनंद मेश्राम
नागभीड : महाशिवरात्री उत्सव शिवटेकडी येथे परिसरात प्राचीन कालखंडापासून सुरू आहे. फाल्गुन महिन्यातील प्रतिपदेच्या अगोदरचा दिवस म्हणजे चौदाव्या दिवशी शिव-पार्वतीच्या लग्नाचा स्मरण दिन म्हणून हा उत्सव अनादी काळापासून साजरा करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत आहे.
. निसर्गरम्य टेकडीवर दोनशे पासष्ट पायऱ्या चढून वर उंच ठिकाणी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेत येते. तिथे वर चढतात छोटे मंदिर आपणास दिसून, गाभाऱ्यातील शिवलिंगाकडे बघितल्यास भक्ताचे मनोभाव पूर्ण झाल्याचा भास होतो. शिवटेकडीच्या पूर्वेस अर्धा किमी अंतरावर सहा हजार वर्षांपूर्वीचा शिळास्तंभ आजही अद्यावत आहेत. यावरून नागभीड गावाची निर्मिती प्राचीन नागवंशीय काळातील सिंधू संस्कृतीतील असून, नागभीड ही प्राचीन वस्ती आहे. हे नागवंशीय गाव आहे. यावरून शिवटेकडी ही सुद्धा प्राचीन काळातील आहे असे निदर्शनास येते.
. नागवंशीय यावरून किंवा शंकराच्या गळ्यातील नागसाप प्रतीक यावरून गावाचे नागभीड नाव पडले असावे असा अनुमान वर्तविला जातो. अर्थात फार प्राचीन परंपरा लाभलेला शिवटेकडीवरील शिवउत्सव हा दीड-दोनशे नव्हेतर हजारो वर्षांपासून इथे पूजापाठ, उत्सव सुरू आहे. जत्रा महोत्सव हा त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुरू झालेला असू शकतो. मात्र आजचे जत्रा स्वरूप हे वेगळे आहे. पूर्वी खेड्यापाड्यातून व इतरत्र परिसरातून बैलबंडीने जत्रेला खूप लोक येत व गर्दी गोळा व्हायची. आज मात्र साधने बदललेली आहेत. 2012 पासून आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे द्वारा शिवमहोत्सव समिती गठीत होऊन आधुनिक तंत्र साधनाद्वारा जत्रेचे स्वरूप बदलविण्यात आले आहे.
. खरेतर शिवरात्रीला रात्रौ कामूनवार नागभीड यांनी नंदीबैल यात्रा घरून टेकडीपर्यंत नेत पायथ्याशी पूजापाठ करीत महादेवाची गाणी, भजने अशा भक्तिमय वातावरणात ही परंपरा दोनशे वर्षापासून या कुटुंबाने परंपरागत जोपासलेली आहे.
शिवरात्र निमित्ताने आज अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्या द्वारा भक्तगणांना साबुदाणा खिचडी वाटप तसेच पाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, इतर सुखसुविधा पुरविल्या जातात.
. आमदार कीर्तीकुमार भांगडीयांनी नगरपरिषदचे सहकार्य व त्यांच्या शिवमहोत्सव समिती द्वारा सांस्कृतिक मनोरंजनात्मक प्रबोधन कार्यक्रम आठवडाभर सादर करण्याचा वसा घेतला आहे. यात दररोज चाळीस-पन्नास हजार प्रेक्षकांची उपस्थिती असते. शिवरात्रीनंतर दोन आठवडे बाजार, जत्रा, मनोरंजन, मेला, विविध दृश्य या ठिकाणी दाखवले जातात.
. शिवटेकडी पायथ्याशी वर आज शिवाची 50 फूट उंच मूर्ती हे विशेष आकर्षक असून, जवळच बाजूला श्री शनिदेवाचे मंदिर, हनुमंताचे मंदिर, दुर्गा मातेचे मंदिर या ठिकाणी निर्माण केलेले असून या ठिकाणी रोषणाई सजावट केली जाते.
शिवटेकडी परिसराला नवे स्वरूप आणण्यासाठी मॉर्निंग वाक संघटना पदाधिकारी यांनीही विशेष योगदान दिलेले आहे.
गुप्त कालखंडात वैष्णव धर्म व शैवधर्म उपासक राजे होते. गुप्त कालखंड इसवी सन 240 ते 510 पर्यंत स्कंदगुप्त यांच्या काळात बैलाच्या शिक्क्याची नाणी अस्तित्वात आली होती. जिवात्म्याशी संबंधित धर्माला शैव धर्म संबोधले आहे. या धार्मिक सहिष्णुतेच्या भावनेतूनच शिवमंदिर उभारणीस प्राधान्य मिळाले आहे. असे संदर्भ मिळतात. नागभीड शिवमंदिराबाबत नरेंद्र हेमने नागभीड यांचे संदर्भ नुसार विशेष बाब म्हणजे भारतात उत्तरदक्षिण अशी 2383 किमी लांब एक शिवशक्ती रेषा असून, या रेषेचे रहस्य बघू जाता, नागभीड शिवमंदिर हे भारतातील धार्मिक आश्चर्यामध्ये समाविष्ट होते. हा एक चमत्कार आहे. आपली पृथ्वी पंचतत्वापासून बनलेली आहे. नागभीडचे शिवमंदिर 79.68 या अक्षांशावर आहे. त्याचप्रमाणे केदारनाथ 79.06 कालेश्वरम 79.90, श्री कालहस्ती 79.69, कांचीपुरम एकंबेश्वर 79.70, रामेश्वरम 79.31 अशा अक्षांशावर शिवशक्ती रेषेवर फार महत्वाची सरळ एका सरळ रेषेत एकाच अक्षांश, रेखावृत्तावर ही धार्मिक स्थळे असणे, रहस्यमय, आश्चर्यकारक बाब नाही काय ? आज नागभीड नगरीचे अत्याधुनिक बदलते स्वरूप व होणारे शहरीकरण यामुळे खरेतर प्राचीन शिल्पे, मंदिर, शिला, साहित्य यांचा ऱ्हास होताना दिसतो आहे. सांस्कृतिक मूल्य जपण्याकरता शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारणे आपले कर्तव्य आहे. आपला अमूल्य संस्कृती ठेवा अबाधित राखायला हवा. यामुळे खरेतर पर्यटन उद्योग व्यवसाय या बाबींना चालना मिळून नागरिकांचे राहणीमान व जीवनमानावर नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो.
. पेरजागड डोंगररांगा यात समाविष्ट असलेली नागभीड टेकडी व जंगलव्याप्त प्रदेश आज बराचसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यात सांस्कृतिक पर्यटन विभागाने व पुरातत्वीय विभागाने लक्ष देऊन नागभीडच्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांना जतन करायला हवे. तशी जबाबदारी स्वीकारायला हवी. नागभीडला इतिहासाच्या संशोधनातून चालना देत नवे प्रयत्न केल्यास अनेक संदर्भ बाहेर येऊ शकतात. अशी आशा करायला हरकत नाही. शिवाचे सर्वसामान्य प्रतीक म्हणजे वृषभ किंवा बैल असून बैल हे शेतकऱ्यांचे शेतीसंस्कृतीचे उदात्तीकरण करणारे दैवत आहे. एकंदरीत महादेव, शंकर देव, रुद्र देव, शंभू, भोलेनाथ, त्रिनेत्रदेव, त्र्यंबकेश्वर अशा विविध नावाने पुजल्या जाणारी महादेवमूर्ती, शिवलिंग म्हणजेच कृषी संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजा शंकर होय. खरेतर आमचा इतिहास हा नोंदी नसलेला, लुप्त झालेला आहे. आज प्राचीन संस्कृती वारसा नागभीड नगरीला लाभलेला आहे. यावरून या संस्कृतीचे धडे पुढील पिढीस मिळून इथल्या कृषी संस्कृतीला नव्हेतर समस्त रयतेला लाभ मिळावा यासाठी सर्वधर्म समभावांचे प्रतीक म्हणून शिवटेकडी मंदिराकडे बघायला पाहिजे.
. टेकडीचे सौंदर्यीकरण वाढते आहे. ही सुखावह अभिनंदनीय बाब आहे. तरीपण याच टेकडी लगत असलेल्या परिसरातील तालुकास्तरीय प्राचीन गावे त्यातील प्रतीके याकडेही लक्ष द्यायला हवे. परिसर तालुक्याचा इतिहास हा प्राचीन असला तरीपण दैदीप्यमान आहे. मानवी स्वभाव, वर्तन, आचरण यावर याचा प्रभाव दिसून येतो. मात्र संस्कृतीचे रक्षण कर्ते होताना या संस्कृतीचे भक्षण होऊ नये असे वाटणे स्वाभाविक आहे. शिव मंदिराची लहान महादेव म्हणून ख्याती असून दर्शन घेणारे भक्तगण आहेत. सदर टेकडी परिसर सांस्कृतिक पर्यटन खात्याने ब वर्ग श्रेणीचा दर्जा देऊन परिसराचा विकास केल्यास, परिसरातील घोडाझरी तलाव, देवटेक, गायमुख, देवतलाव, पाचपांडव गुंफा, अड्याळ टेकडी असे अन्य परिसरातील सांस्कृतिक स्थळे यांनाही लाभ होऊन, पर्यटनास अनुकूल नागभीड तालुका होईल. इथल्या परिसरात अनेक व्यवसाय, उद्योग व बाहेरील पर्यटकांची आदानप्रदान होऊन परिसराचे सांस्कृतिक मूल्य वाढवण्यास मोलाची मदत होईल.
नैसर्गिक निर्मित परिसर जंगलव्याप्त असल्याने ह्या क्षेत्राचे नागरिकांनी स्वतःच ऱ्हास केल्यास पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन, पुढे अनेक तोटे, प्रश्न, समस्यांना समोर जावे लागेल.
. आज टेकडी परिसरात शिवनगर हे गाव वसले असून, टेकडी पायथ्याशी पर्यंत अतिक्रमित घरे तथा रोडच्या आजूबाजूला अनेक संस्था, समाज, कार्यालय स्थळे उभारली जात आहेत. मात्र हा भाग जर मोकळा असतात तर इथल्या जत्रेला व कार्यक्रमास भरपूर जागा मिळाली असती. कदाचित पुढे जागेचा अभाव होऊन पर्यावरणाचे प्रदूषण होते आहे काय? असा प्रश्न सर्वांना भेडसावतो आहे. हजारो वर्षाचे सांस्कृतिक मूल्यत्व अबाधित राखण्यास भक्ती, श्रद्धाभाव रूपाने समोर येत शिवशंभू महादेवाचे मंदिर धार्मिक आश्चर्य, एकमेक स्वयंभू ठिकाण आहे म्हणून पुढल्याही पिढीने वारसा जपणे आवश्यक आहे.


