डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन
बल्लारपूर येथे रौप्य महोत्सवी कार्यक्रम
बल्लारपूर : चिंतामणी गृप शिक्षण संस्था मागील २५ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात ऊभी आहे. या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल उज्ज्वल ठरली आहे. वसंतोत्सवात रौप्य महोत्सव हा योगायोग आहे. संस्था चालविताना ध्येय निश्चित करावे लागते. हेच ध्येय संस्था चालकांनी जोपासले आहे. आजघडीला कृत्रिम बुद्धीमत्ता जोर धरत आहे. हा शिक्षण क्षेत्रात बदल आहे. या बदलाकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. समाजाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे. मात्र चिंतामणी शिक्षण संस्थेने अभिमत विद्यापीठाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी बल्लारपूर येथे रविवारी केले.
. चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतामणी गृप शिक्षण संस्थेच्या वतीने बल्लारपूर येथील गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह, पेपर मिल कलामंदिर जवळ येथील सभागृहात रौप्य महोत्सवी कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी नागपूर येथील व्हि.एन.आय.टी.चे डॉ. दिलीप पेशवे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार,नागपूर रा.तु.म.चे माजी प्रकुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर,गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, व्याख्याते गणेश शिंदे, शुभांगी दोंतुलवार, डॉ. रजनी हजारे, सुमन प्रभाकरराव मामुलकर,संदीप पोशेट्टीवार, प्रा.मनिष पोतनुरवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
. दरम्यान चिंतामणी गृप शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक दिवंगत प्राचार्य डॉ. वसंतराव दोंतुलवार, अध्यक्ष दिवंगत डॉ. वैभव दोंतुलवार व आराध्यदैवत श्री गणेश यांच्या प्रतिमेला मालार्पण व अभिवादन करून मान्यवरांनी केले.यावेळी संस्थापक डॉ. वसंतराव दोंतुलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या वसंतोत्सव पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान चिंतामणी गृप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील दोंतुलवार व रूषाली दोंतुलवार यांचा पोभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मार्फत प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करून भावपूर्ण सत्कार केला.रौप्य महोत्सवी कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ. प्राजंली आईंचवार यांनी करून चिंतामणी गृप शिक्षण संस्थेची आजवरच्या प्रगतीचा आढावा सादर केला. आभार प्रदर्शन प्रा. मनिष पोतनुरवार यांनी केले. यावेळी चिंतामणी गृप शिक्षण संस्था बल्लारपूर, पोंभूर्णा,गोंडपिपरी,विसापूर व घुग्घुस येथील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रौप्य महोत्सवी कार्यक्रम अंतर्गत भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी चिंतामणी गृप शिक्षण संस्थेतील अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळातील सदस्य व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
शिक्षणाच्या प्रवाहात शिक्षकांची भूमिका महत्वाची – गणेश शिंदे आजघडीला शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. चिंतामणी गृप शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. शिक्षकांमुळे तो नावारूपास आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देताना, त्यांच्या कडे आपुलकीने व प्रेमाच्या भावनेने पाहिले पाहिजे. हे माझे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांत भावना रूजली पाहिजे. प्रत्येक शिक्षकांनी दहा गुणवान विद्यार्थी घडवावे.ते उच्च पदावर गेल्यावर आपली आठवण काढतील.म्हणून शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे ओजस्वी मनोगत व्याख्याते गणेश शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.


