भद्रावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण भोई समाजाचे प्रथम राष्ट्रीय १८ व १९ जानेवारीला अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भद्रावती येथील माजी नगरसेवक तथा मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्थेचे संचालक नंदू पढाल यांना भोईराज समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
. या अधिवेशनात उद्घाटक म्हणून राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित होते. या अधिवेशनात भोई समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक. आर्थिक, रोजगार संबंधातील व राजकीय विषयांवर मंथन करून दिशा ठरवण्यात आली. या राष्ट्रीय अधिवेशनात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधव आणि भगिनींना पुरस्कार सुद्धा देण्यात आले त्यातच नंदू (नरेंद्र) पढाल नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय व भोई समाजाबद्दल असलेल्या प्रेम, निष्ठा व कार्याची दखल घेत आचार्य गोविंद ब्रह्मगिरी महाराज यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर यांच्या हस्ते हा महाराष्ट्र भोईराज रत्न समाज पुरस्कार देऊन भद्रावती येथील माजी नगरसेवक नंदू पढाल यांना गौरवण्यात आले. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यातून समाजाचे प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी व असंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.


