प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे प्रतिपादन
विसापुरात सकल कुणबी समाज प्रबोधन कार्यक्रम
बल्लारपूर : जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षापूर्वी ‘ मन करा रे प्रसन्न, सगळे सिद्धीचे कारणं ‘ या अभंगवाणीतून जगण्याचा मार्ग सांगितला आहे. सकल कुणबी समाजात सर्व जातीचे मूळ दडले आहे. त्यांनी शब्दांची रचना रत्न म्हणून केली. हेच शब्द शस्त्र व शास्त्र असल्याचे म्हटले आहे. आपण सर्वांनी मुक्त तुकाराम स्विकारले पाहिजे. त्यांनी सकारात्मक विचार प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.खरं म्हणजे जगतगुरू संत तुकाराम महाराज लोककल्याणासाठी जगले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांनी येथे केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सार्वजनिक मंचावर सकल कुणबी समाजातर्फे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती महोत्सव निमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते तथा माजी जि. प.सदस्य रामभाऊ पाटील टोंगे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. दिपक चटप, प्रा.डॉ. दिलीप चौधरी, गायत्री थिपे, अशोक थेरे, सुमन गौरकर,विलास भोयर,विद्या वि.झाडे, आशा काळे, संतोष यनगंटीवार यांची उपस्थिती होती.
. दरम्यान सकल कुणबी समाजातर्फे गायत्री थिपे, ॲड.दिपक चटप व डॉ. दिलीप चौधरी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक भाषणातून शारदा डाहुले यांनी सकल कुणबी समाजाच्या वाटचालीची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन सुरज गोहणे यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रकांत पावडे यांनी केले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
तुकाराम महाराजांनी समतेचा विचार मांडले – ॲड. दिपक चटप जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. यातून त्यांनी जाती मर्यादिचे उल्लंघन केले. सकल कुणबी समाजाने तीन ‘ र ‘ पासून परावृत्त व्हावे. शिक्षणाचा ध्यास घ्यावा.तेच प्रभावी साधन आहे. आपल्यातील समस्या निवारण करण्यासाठी उपयोगी पडणारे आहे. ‘ बोले तैसे चाले,त्यांची वंदावी पाऊले ‘ हाच मंत्र संतांनी दिला. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा समतेचा विचार आपणास पुढे जाण्यास उपयुक्त आहे, असे ॲड.दिपक चटप यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले.


