मागासवर्गीय हायस्कूल वासेरा येथील विद्यार्थ्यांचा पुढाकार
सिंदेवाही : शेतकऱ्यांचे पीक पाणी हातात आल्यानंतर मकरसंक्रांती पासून सिंदेवाही तालुक्यात बैलांच्या शर्यतीचा पट भरण्यास सुरुवात झाली असून नुकताच १८ जानेवारी रोजी वासेरा येथील प्रसिद्ध असलेला बैलांच्या शर्यतीचा पट पार पडला आहे. सदर पाटाच्या जागेवर लागलेल्या दुकानांचा केर कचरा, प्लास्टिक, पिशवी, इत्यादी वस्तू उचलून मागासवर्गीय हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून शंकर पटाची जागा स्वच्छ केली आहे.
. सिंदेवाही तालुका हा बैलांच्या शंकर पटासाठी प्रसिद्ध असून जानेवारीतील पहिल्या आठवड्यात या तालुक्यात बैलांच्या शंकर पटांची सुरुवात होते. शेतकरी पीकपाणी हाती आल्यानंतर विरंगुळा मिळवण्यासाठी गावागावांतील शेतकरी बैलांच्या पटांचे आयोजन करीत असतो. दरवर्षी प्रमाणे १८ जानेवारी २०२५ रोजी वासेरा येथे बैलांचा शंकर पट भरविण्यात आला. पटावर झुले, फळांचे दुकान, हॉटेल्स, रसवंती, पान टपरी, चहा टपरी, भाजीपाला इत्यादी किरकोळ दुकाने लावण्यात आली. त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवी, यासारख्या वस्तू पडल्या असल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरू नयेत. तसेच कोणत्याही प्राण्यांना त्या प्लास्टिक पिशव्यांचा त्रास होऊ नये. साठी मागासवर्गीय चे सर्व विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून पटावरील सर्व प्लास्टिक पिशव्या उचलून पटाच्या संपूर्ण जागेची स्वच्छता केली. यावेळी पट पंच कमिटी अध्यक्ष महेंद्र कोवले, सचिव राजू नंदनवार उपस्थित होते.


