कन्नमवार प्रेमींची मागणी
भद्रावती : येथील आयुध निर्माणी चांदा कारखान्याच्या नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भांदक चेक पोस्ट मुख्य प्रवेशद्वारा समोर माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्पकाळात त्यांनी येथील आयुध निर्माणीची स्थापना करून जिल्ह्यात औद्योगिकरणाचा पाया रचला.
. आता या जिल्ह्यात जन्मलेले आणि बालपण घालविलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या उभारणीत पुढाकार घेतील अशी आशा मा. सा. कन्नमवार यांचे प्रेमी करीत आहे. आज दि. १० जानेवारीला त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी होत आहे. १९६२-६३ या एक वर्षाच्या अल्पकाळात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. त्यात त्यांनी कृष्णा-गोदावरी पाणी वाटप, कोकण रेल्वे, राज्याचे कामकाज मराठीतून करणे, ठाणे खाडी प्रकल्प, चीन युद्धानंतर राज्यात संरक्षण प्रकल्पांची निर्मिती. त्यातूनच भद्रावती शहरात संरक्षण साहित्य उत्पादन प्रकल्पाचा आयुध निर्माणी हा प्रकल्प उभारला.
. या जिल्ह्यात जन्मलेल्या मा. सा. कन्नमवार यांचे कर्तृत्व पुढील पिढीला सतत प्रेरणा देत रहावे या उद्देशाने त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केल्या जात आहे. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील अशी आशा त्यांच्या प्रेमींनी व्यक्त केली आहे.


