Home सामाजिक शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती !

शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती !

9

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘घरबसल्या पीक कर्ज’ प्रणालीचा शुभारंभ

पारंपारिक कर्ज प्रक्रियेला फाटा

बँकेच्या नवीन संकेतस्थळाचे आणि नियमावली पुस्तिकेचेही दिमाखदार अनावरण

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘कृषी ३६०’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी अत्याधुनिक डिजिटल पीक कर्ज प्रणालीचा दिमाखदार शुभारंभ मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे अत्यंत उत्साहात पार पाडला. या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमामुळे पारंपारिक कर्ज प्रक्रियेला फाटा मिळणार असून, आता पीक कर्ज प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या सेवा मिळतील आणि त्यांचा वेळ व श्रम दोन्हींची बचत होईल. या सुवर्णक्षणी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बँकेच्या माहितीपूर्ण नियमावली पुस्तिकेचे तसेच बँकेच्या अत्याधुनिक नवीन संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे बँकेच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात ग्राहकांसाठी अधिक सुलभ होतील.

.      या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा योग मला आला, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (चंद्रपूर) जयसिंग ठाकूर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शतृणाल फुलझले, बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेश खान पठाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

.      जिल्हाधिकारी वसुमना पंत ह्या निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण कामामुळे, तसेच प्रविण वानखेडे (विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर) हे न्यायालयीन कामात व्यस्त असल्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यांनी आपली चित्रफित (व्हिडिओ संदेश) पाठवून बँकेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

.     या सोहळ्याला बँकेच्या संचालक मंडळातील यशवंत दिघोरे, गणेश तर्वेकर, रोहित बोम्मावार, जयंत टेमुर्डे, गजानन पाथोडे, ललित मोटघरे, सुदर्शन निमकर, दामोधर मिसार, उल्हास कर्पे, विजय बावणे, डॉ. अनिल वाढई, विलास मोगरकर, दिनेश चोखारे, निशिकांत बोरकर व नंदाताई अल्लुरवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.

error: Content is protected !!