जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र
चंद्रपूर : सध्या खरिपाच्या पूर्वतयारीसह विविध शेतीकामांना वेग आला आहे. अशा ऐन हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या डिझेल टंचाईच्या गंभीर समस्येची बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी थेट चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून पुढाकार घेतला आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या या संवेदनशील पावलामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.
डिझेल कॅनमध्ये मिळण्यासाठी आणि राखीव कोट्यासाठी मागणी
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पाण्याचे पंप आणि थ्रेशर यांसारखी कृषी यंत्रसामग्री चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता भासते. अनेक शेतकऱ्यांची शेती गावापासून दूर किंवा दुर्गम भागात असल्याने दरवेळी यंत्रे थेट पेट्रोल पंपावर नेणे शक्य होत नाही. अशा वेळी शेतकरी डिझेल कॅन (डबे) घेऊन पंपावर जातात. मात्र, अनेक पेट्रोल पंप चालक विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून शेतीची कामे रखडली आहेत.
. या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा किंवा इतर आवश्यक ओळखपत्रांच्या आधारे शेतीकामासाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना संबंधित पुरवठा विभाग आणि पेट्रोल पंप चालकांना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांसाठी डिझेलचा स्वतंत्र राखीव कोटा ठेवण्याबाबतही योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांकडून आभार आणि धन्यवाद
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम शिवशंकर आमणे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. “शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे सुधीरभाऊंसारखे खंबीर नेतृत्व लाभल्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतीकामांना गती येईल आणि डिझेल टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यांचे जनहिताचे कार्य असेच पुढेही अविरत सुरू राहो,” अशा भावना शुभम आमणे यांनी व्यक्त केल्या आहेत.


