भद्रावतीच्या गुंजन पिंपळकरला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात !
‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियाना’तून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
हलाखीच्या परिस्थितीत गरिबांच्या लेकीला मिळाली नवी दृष्टी
भद्रावती : समाजातील उपेक्षित, वंचित आणि गरजू घटकांच्या उत्थानासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या ‘स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत भद्रावती येथील कुमारी गुंजन प्रदीप पिंपळकर हिच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे एका जिद्दी विद्यार्थिनीला केवळ दृष्टीच नव्हे, तर उज्ज्वल भविष्याची नवीन उमेद मिळाली आहे.
संकटाच्या वेळी मदतीचा धावून आला ‘हात’
गुंजन पिंपळकर ही सध्या दहावीत शिकत असून ती ट्रस्टची ‘शैक्षणिक दत्तक’ विद्यार्थिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला डोळ्यांचा तीव्र त्रास होत होता, ज्यामुळे तिच्या अभ्यासात मोठे अडथळे निर्माण झाले होते. डॉक्टरांनी तपासणीअंती तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेचा मोठा खर्च पेलणे पिंपळकर कुटुंबाला अशक्य होते. अशा कठीण प्रसंगी गुंजनच्या आईने ट्रस्टकडे मदतीची आर्त हाक दिली.
तात्काळ निधी मंजूर : स्वप्नांना बळ
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी कोणत्याही विलंब न लावता तातडीने निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे यांच्या हस्ते शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहकार्याचा धनादेश गुंजनच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला.
आईच्या डोळ्यातून वाहिले कृतज्ञतेचे अश्रू
मदत स्वीकारताना गुंजनची आई भावूक झाली होती. “आमच्यावर कोसळलेल्या संकटाच्या काळात ट्रस्ट खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. या मदतीमुळे माझ्या मुलीचे डोळे तर बरे होतीलच, पण तिचे शिक्षणही थांबणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे,’ ही ट्रस्टची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
सामाजिक कार्याचा अखंड यज्ञ
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्टने चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. ट्रस्टच्या विविध उपक्रमांतून आतापर्यंत गंभीर आजारांच्या रुग्णांना लाखांची मदत देऊन जीवदान दिले, गरीब व निराधार मुलांच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण भार उचलला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून दिले, दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकलींचे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनवले. अशे कार्ये पार पडली आहेत.
. या मदतीमुळे गुंजन आता पुन्हा जिद्दीने आपल्या दहावीच्या परीक्षेची तयारी करू शकणार आहे. तिच्या या यशात शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.


