पारंपरिक अवजारांसह शेतकरी रस्त्यावर
प्रशासनाचे वेधले लक्ष
प्रलंबित मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
वरोरा : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारी आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, ३० मार्च रोजी वरोरा येथे भव्य ‘तुत्या-रुमन’ आंदोलन करण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
![]()
. हे आंदोलन सकाळी ११ वाजता स्थानिक गांधी चौक येथून सुरू झाले. आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी शेतकरी आपल्या पारंपरिक शेती अवजारांसह, विशेषतः ‘तुत्या आणि रुमन’ घेऊन रस्त्यावर उतरले होते. जिल्हाध्यक्ष किशोर डुकरे यांच्या मार्गदर्शनात निघालेला हा मोर्चा सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला, तिथे मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
. यावेळी बोलताना किशोर डुकरे यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. “सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत प्रहारचा संघर्ष थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकरी, प्रहारचे पदाधिकारी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


