शिर्डीतील भव्य संमेलनात होणार गौरव
पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
नानक साई फाउंडेशनतर्फे २५ मार्चला सन्मान सोहळा
भद्रावती : पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या लेखणीने समाजप्रबोधन करणारे आणि सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे भद्रावती येथील पत्रकार अतुल कोल्हे यांची २०२६ च्या प्रतिष्ठित ‘नानक साई अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे आयोजित एका भव्य दिव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
. नानक साई फाउंडेशनच्या वतीने बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी शिर्डी येथे ‘भव्य दिव्य साई संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला देशभरातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. नानक साई फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे आणि केंद्रीय उपाध्यक्ष प्रीतम सिंह भाटिया यांनी अतुल कोल्हे यांना या पुरस्काराचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.
. अतुल कोल्हे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची आणि भरीव कामगिरीची दखल घेत फाउंडेशनने त्यांना ‘नानक साई अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
. एका निष्कलंक आणि ध्येयवादी पत्रकाराचा राष्ट्रीय स्तरावरील फाउंडेशनकडून सन्मान होत असल्याने भद्रावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार बांधव, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


