मांगली येथे ‘महाराजस्व अभियान’ शिबिर संपन्न
शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
भद्रावती : “शासन आपल्या दारी या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले ‘महाराजस्व अभियान’ ही केवळ एक दिवसाची औपचारिकता नसून, प्रशासकीय सेवेची ही एक नवी सुरुवात आहे. कार्यालयात येणारा प्रत्येक सामान्य नागरिक हा आपला ‘देव’ आहे, असे समजून त्यांचे काम जलद आणि सुलभ पद्धतीने पूर्ण करणे ही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे,” असे परखड प्रतिपादन चंद्रपूरचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.
. भद्रावती तालुक्यातील मौजा मांगली येथे शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा १)’ च्या शिबिरामध्ये अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश एकाच छताखाली सर्व विभागांच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी (चंद्रपूर) अतुल जटाले, भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, गट विकास अधिकारी बंडु आकुनवार, भूमी अभिलेख उपअधीक्षक कृष्णा पारधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम, पशुधन विकास अधिकारी डॉ. बेनिया, दुय्यम निबंधक झाडे, आणि गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
. पुढे बोलतांना डॉ. व्यवहारे म्हणाले की, प्रशासनाने सर्वसामान्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत योजना पोहोचवाव्यात आणि नागरिकांनीही प्रशासनाच्या सतत संपर्कात राहावे, जेणेकरून एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. मांगली येथील या शिबिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महसूल, आरोग्य, कृषी, पंचायत समिती यांसह विविध विभागांच्या स्टॉल्समुळे ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती आणि लाभ मिळवणे सोपे झाले.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राजेश भांडारकर यांनी केले. त्यांनी अभियानामागची भूमिका विषद केली. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्राम महसूल अधिकारी राजूरकर यांनी मानले.
. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी तुराळे, राहुल भोगळे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, महिला आणि नागरिक उपस्थित होते. शासकीय यंत्रणा थेट गावात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


