आ. मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर प्रशासनासह भाजप पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
बळीराजाला धीर देण्यासाठी माजी आमदारांसह नेत्यांची फौज मैदानात
चंद्रपूर : अकाली पाऊस आणि वादळामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता, राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीची दखल घेत, मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
![]()
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
जिल्ह्यातील सावली, मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिपरी आणि चंद्रपूर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेली मक्का, गहू, मिरची, चणा, कापूस आणि ज्वारी यांसारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, “एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या,” अशा स्पष्ट सूचना आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची बांधावर धाव
आमदारांच्या सूचनेनंतर केवळ प्रशासकीय यंत्रणाच नव्हे, तर भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. माजी आमदार अतुल देशकर, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
. या पाहणी दौऱ्यात सावली तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, विजय गुरनुले, अनिल मोरे, राजू बुद्धलवार, सरपंच फलींद्र सातपुते, प्रमोद कळसकर, राहुल संतोषवार आणि कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
तात्काळ मदतीचा विश्वास
“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचे अचूक मूल्यमापन करावे, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत लवकरात लवकर प्राप्त होईल, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.


