भद्रावतीत रंगला ‘ग्रामगीता’ प्रणित गृहस्थाश्रम प्रवेश सोहळा !
पुरोहिताऐवजी महिला प्रचारिकेने लावले गृहस्थधर्माचे तत्त्वज्ञान
माथनकर परिवाराचा वैचारिक क्रांतीचा नवा पायंडा
भद्रावती : विवाह हा समारंभ आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने आणि विशेषतः पूर्वापार चालत आलेल्या विविध प्रथा-परंपरा पाळत श्रद्धेपूर्वक पार पाडत असतो. विवाह संस्कारांच्या अशा अनेक परंपरा समाजात असताना, काळाच्या ओघात अनेक प्रथा कालबाह्य झाल्या आहेत. तरीही केवळ प्रतिष्ठा, समाजभिती तसेच अज्ञानापोटी आपण त्या परंपरांचे अनुसरण करत असतो. मात्र, येथील संजय माथनकर यांनी आपल्या मुलाच्या लग्नसमारंभात या कालबाह्य परंपरेला फाटा देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
पुरोहिताऐवजी महिला गुरुदेव प्रचारिकेकडून पूजन
विवाहोपरांत दुसऱ्या दिवशी घरी पूजेची परंपरा पाळली जाते. परंतु या परंपरेला बगल देत माथनकर परिवाराने पुरोहितांच्या ऐवजी महिला गुरुदेव प्रचारिका ग्रामगीताचार्य शुभांगी गुणवंत कुत्तरमारे यांच्याकडून हे पूजन करवून घेतले. याप्रसंगी शुभांगीताईंनी ‘गृहस्थाश्रम प्रवेश पूजा’ करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीतेतील ‘संसार-परमार्थ’ या अध्यायाचे वाचन केले. यातून त्यांनी नवदाम्पत्याला गृहस्थधर्माचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
नव्या पिढीचा आध्यात्मिक सहभाग
कार्यक्रमाची सुरुवात अधिक मंगलमय झाली जेव्हा शुभांगीताईंची मुलगी कुमारी आर्या गुणवंत कुत्तरमारे हिने श्रीमदभगवत गीतेतील श्लोक पठण करून विधिवत पूजन केले. उच्चशिक्षित कुटुंबातील हा वैचारिक सोहळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
अंधश्रद्धेला छेद आणि बुद्धिप्रामाण्यवाद
आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असतानाही मानवी मनावर अंधश्रद्धांचा पगडा कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “ऐशा ज्या ज्या चालीरीती। झुगारोनी द्याव्या हातोहाती। पुन्हा करावी नवीन निर्मिती। समाज नियमांची।” याच विचाराने प्रेरित होऊन, आदर्श शिक्षक संजय माथनकर यांचे चिरंजीव संकेत व नववधू आकांक्षा (दोघेही उच्चशिक्षित व मोठ्या पदावर कार्यरत) यांनी या नाविन्यपूर्ण पूजेचा स्वीकार केला.
समाजातून कौतुकाचा वर्षाव
कोणतीही प्रथा पाळताना त्याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होत असतो. पोकळ अंधश्रद्धेच्या आहारी न जाता बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारून वाटचाल केल्यास समाजाचे जीवन पोषक होऊ शकते, हे या कृतीतून सिद्ध झाले. माथनकर परिवाराचा हा पुरोगामी विचार आणि शुभांगी कुत्तरमारे यांच्या कार्याचे गुरुदेव परिवारासह समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


