सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
महापौर पदाचा सव्वा वर्षाचा करार पाळणार
चंद्रपुरात रिंग रोड व भव्य क्रीडा संकुल उभारणार
चंद्रपूर : भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात महापौर पदाबाबत सव्वा वर्षाचा करार झाला असून, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तसा लेखी दस्तऐवज तयार आहे. मी शब्दाला जागणारा नेता असल्याने या कराराचे तंतोतंत पालन केले जाईल. सव्वा वर्षानंतर काही तांत्रिक बाबी उद्भवल्या तरी महापौर पद शिवसेना ठाकरे गटालाच दिले जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
WhatsApp channel ला फॉलो करा
Follow the नवामार्ग न्यूज पोर्टल channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBf25zJZg42cX0j0k1J
. आज जरी आमच्याकडे ३२ नगरसेवकांचे समर्थन असले, तरी येत्या सहा महिन्यातच हे संख्याबळ ४४ ते ४६ च्या जवळपास पोहोचलेले दिसेल, असा दावाही मुनगंटीवार यांनी यावेळी केला. नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर व उपमहापौर प्रशांत दानव यांचा सत्कार केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
विकासासाठी घेणार कठोर निर्णय
शहराच्या विकासाचा आराखडा मांडताना मुनगंटीवार म्हणाले की, सध्या महापालिकेचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी प्रशासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मात्र, विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. भाजप, शिवसेना आणि अपक्षांप्रमाणेच काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील कामेही प्राधान्याने केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
वाहतूक कोंडी फुटणार : साडेचार किमीचा रिंग रोड प्रस्तावित
शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी म्हाडा कॉलनीतून साडेचार किलोमीटरचा रिंग रोड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच म्हाडा परिसरात २ हजार स्वस्त घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
क्रीडा आणि पर्यटन विकासावर भर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी ५० ते ७५ एकर जागेत भव्य क्रीडा संकुल उभारणे, रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व विकास, नवीन स्वच्छता गृहांची निर्मिती आणि संडे मार्केटला अधिकृत जागा मिळवून देणे ही आमची प्राथमिकता असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.


