Home चंद्रपुर जिल्हा विशेष ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची वाट

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची वाट

583

संतप्त महिलांनी रोखली वाहने

रेल्वे कामाच्या जड वाहतुकीमुळे गाडगेबाबा पुतळ्याला धोका

नंदोरी ग्रामस्थ आक्रमक

भद्रावती : बल्लारशा ते वर्धा दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी लागणारी गिट्टी आणि डस्टची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड हायवा ट्रकांमुळे नंदोरी येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यालाही हादरे बसत आहेत. या प्रकाराचा निषेध म्हणून शनिवारी सायंकाळी ७ वाजता गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत ओव्हरलोड वाहने रोखून धरली होती.

.       भद्रावती तालुक्यातील विसलोन येथे तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे काम नंदोरी खुर्द येथील व्यंकटेश क्रशिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीतून ४० टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेणारे हायवा ट्रक नंदोरी गावातून विसलोनकडे जात आहेत. या सततच्या वाहतुकीमुळे गावात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वाहतुकीच्या याच मार्गावर संत गाडगेबाबा यांचा पुतळा असून जड वाहनांच्या हादर्यांमुळे पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे. शनिवारी माजी जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे सह सुवर्णा कुळसंगे, सीमा आत्राम, जयश्री आत्राम, भारती देशकर आणि मांडवकर यांच्यासह अनेक महिलांनी पुतळ्याजवळ ही वाहने अडवून धरली. त्यानंतर अर्चना जिवतोडे यांनी संबंधित व्यवस्थापनाशी संपर्क साधला. कंपनीने यापुढे या मार्गावरून वाहतूक करणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी वाहने सोडून दिली.

आरटीओची सामान्यांवर ‘नजर’; ओव्हरलोड वाहतुकीला अभय ?

  • चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वरोरा परिसरात दिवसरात्र आरटीओ अधिकारी तैनात असतात. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची कारवाई म्हणजे ‘गरिबांना त्रास आणि धनदांडग्यांना खास’ असाच प्रकार सुरू आहे. दुचाकीस्वाराला किंवा सामान्य वाहनधारकाला रस्त्यात अडवून कायद्याचा धाक दाखवणारे हे पथक. डोळ्यादेखत सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती, कोळसा आणि गिट्टीच्या वाहतुकीकडे मात्र सोयीस्कररीत्या डोळेझाक करत आहे.
  • आरटीओच्या कारवाईच्या भीतीने स्कूल ऑटो चालक वाहने बाहेर काढायला घाबरतात, ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर ताटकळत राहावे लागते. मात्र, याच अधिकाऱ्यांच्या नाकाखालून नियम धाब्यावर बसवून 40-40 टन वजन वाहून नेणारे हायवा ट्रक बिनधास्तपणे कसे धावतात? ओव्हरलोड रेती आणि कोळशाच्या या वाहतुकीने महामार्गाची व गावातील रस्त्यांची वाट लागली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आरटीओचा हा ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा जिल्ह्याच्या चर्चेचा विषय ठरत असून, अवैध जड वाहतुकीला कोणाचे वरदहस्त लाभले आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
  • एकीकडे शालेय वाहनांवर कठोर कारवाई केली जात असताना, दुसरीकडे आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत ओव्हरलोड जड वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. या ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, आरटीओच्या पक्षपाती भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!