डॉ. प्रशांत नारनवरे यांचा विद्यार्थिंना सल्ला
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मार्गदर्शन कार्यक्रम
बल्लारपूर : शिक्षणामध्ये एखाद्या विषयातील पदवी ही गुणवत्ता सिद्ध करत असते.याच पदवीला कौशल्य शिक्षणाची जोड मिळाल्यावर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवते. म्हणून शिक्षणाच्या मूल्यवाढीसाठी कौशल्य शिक्षणाची जोड महत्वाची ठरते,असा सल्ला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बल्लारपूर येथे विद्यार्थिंना दिला.
. बल्लारपूर येथील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ संकुलात मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार (दि.13) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोबत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त प्रबंधक रमेश येवले, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची उपस्थिती होती.
. यावेळी संवाद साधताना डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, पूर्वी पदवीधारकांना समाजात सन्मान दिला जात होता. त्यांना रोजगारांची संधी मिळत होती.आजची परिस्थिती विपरीत आहे. पदवीधर देखील बेरोजगारीचे चटके सोसत आहेत. हे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. यासाठी पदवीधरांना देखील कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
. दरम्यान त्यांनी विसापूर गावाच्या हद्दीतील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ उपकेंद्र परिसरात संकुलाच्या बांधकामाचे निरीक्षण केले. तेथील बांधकामाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. भविष्यात सदर संकुल महिलांना रोजगार मिळवण्याचे मोठे दालन खुले होणार असल्याचा आशावाद डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी करून येथे चालणाऱ्या उपक्रमाची माहिती सादर केली. संचालन प्रा. अपेक्षा पिंपळे यांनी केले, तर आभार सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी मानले. यावेळी सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


