उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांचे प्रतिपादन
गिलबीली येथे अनुसूचित जाती, जमाती दक्षता समितीची सभा
बल्लारपूर : आपली व्यवस्था पूर्वी राजेशाही स्वरूपाची होती.त्यानंतर परकीय पारतंत्र्यात आपली जडणघडण झाली. आज आपण लोकशाही अनुभवत आहोत.मात्र याची पाळेमुळे खोलवर रुजली नाही. परिणामी कायदे असूनही वंचित घटकांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संविधानात्मक कायदे लागू आहेत. त्या कायद्याचे आपणाकडून पालन होत नाही.यासाठी सामाजिक सौहार्दाची पाळेमुळे खोलवर रुजवणे आज देखील आवश्यक आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांनी केले.
. बल्लारपूर पंचायत समिती व उपविभागीय कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय दक्षता समितीच्या वतीने गिलबीली येथे मंगळवार (दि. 13) रोजी यशोधादेवी आदीवासी निवासी शाळेच्या सभागृहात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये जनजागृती सभा पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर तालुका अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध दक्षता व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, सदस्य ॲड. हरिश गेडाम, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, बल्लारपूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी साहेबराव पवार, यशोधरादेवी आदीवासी निवासी शाळेचे अधिक्षक धनराज ताडाम, मुख्याध्यापक डी. आर. निरंजने, बि. आर. पिपरे, गिलबीली ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र सुरपाम, ग्रामपंचायत अधिकारी सुषमा नंदेश्वर यांची उपस्थिती होती.
. दरम्यान याप्रसंगी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते जनजागृती सभेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्याची माहिती ॲड.हरिश गेडाम यांनी दिली. दक्षता समितीचे सदस्य अनेकश्वर मेश्राम यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून साहेबराव पवार यांनी जनजागृती सभेची व दक्षता तथा संनियंत्रण समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक तुषार चिचघरे यांनी केले. आभार प्रदर्शन कैलास उलमाले यांनी केले. यावेळी विद्यार्थी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.


