खासदारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेत नवे पाऊल
आपत्कालीन स्थितीत रुग्णांना मिळणार तात्काळ मदत
वरोरा : शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘२४ तास सेवा ग्रुप’ च्या वतीने एका नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकेचे पूजन करून ती रुग्णसेवेसाठी अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे, खासदार धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा लोकहितकारी उपक्रम राबविण्यात आला आहे.
निस्वार्थ सेवेचा वारसा वरोरा शहरातील ‘२४ तास सेवा ग्रुप’ मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवा देत आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत हा ग्रुप तत्परतेने धावून जातो. आता या ताफ्यात नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्यामुळे, गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला प्रविण काकडे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण खिरटकर, २४ तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अनिकेत मेश्राम, अक्षय शिरसागर, महेक केशवाणी, किरण लेंडे, मनीषा मेश्राम, तसलीम शेख, सुनदा पाऊलकर यांच्यासह ग्रुपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


