बल्लारपूर : शासनाचा प्रयत्न वंचित घटकांना न्याय देण्याचा आहे. मानवी जीवनात डोळे हे महत्वाचे अवयव आहेत. जगाची सुंदरता चांगली न्याहाळता यावी यासाठी डोळ्यांची निगा आपण राखली पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले.
मोफत नेत्र तपासणी शिबिर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने समाजकल्याण विभागांतर्गत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिना मडावी, विसापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अविशा मडावी, पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी साहेबराव पवार उपस्थित होते.
गरजू लाभार्थ्यांना चष्मे वाटप यावेळी अनुसूचित जाती, जमाती व विमुक्त जाती प्रवर्गातील गरजू लाभार्थ्यांची तज्ञ नेत्रचिकीत्सकांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शेकडोवर रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे यांनी केले, तर आभार अनेकश्वर मेश्राम यांनी मानले. मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते.


