प्रतिभाताई धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण वणी येथेच गेले असून त्यांनी आपले शालेय शिक्षण तेथेच पूर्ण केले. त्यांच्या माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मात्र समाजसेवेचा वारसा त्यांना उपजतच लाभला होता.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर आज केवळ एक लोकप्रतिनिधी नसून, विदर्भातील महिला नेतृत्वाचा एक खंबीर चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा ‘गृहिणी ते खासदार’ हा प्रवास जिद्द आणि लोकसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.
प्रारंभीचे स्वरूप : सुरुवातीला त्यांनी केवळ एक गृहिणी म्हणून घराची जबाबदारी सांभाळली, मात्र पतीच्या निवडणुकांमध्ये त्या प्रचाराच्या नियोजनाची धुरा सांभाळू लागल्या. या काळातच त्या लोकांमध्ये मिसळून भाषण करायला आणि जनसामान्यांचे प्रश्न समजून घ्यायला शिकल्या.
यशस्वी कामकाज आणि राजकीय वाटचाल
राजकीय प्रवेश आणि आमदार म्हणून पहिली भरारी : प्रतिभा धानोरकर यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश २०१९ मध्ये झाला. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आमदार म्हणून निवडून आल्या. येथूनच त्यांच्या राजकीय नेतृत्वाची खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. आमदार म्हणून त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात दिलेले योगदान त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची पायाभरणी ठरले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात : पती दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधाचा सामना करत त्यांनी ही निवडणूक जिंकली. “संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही” हा त्यांचा विचार आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खासदार म्हणून ऐतिहासिक विजय :२०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी मोठी परीक्षा होती. पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. या निवडणुकीत त्यांनी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, मुनगंटीवार यांचा त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही सुमारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर राहिल्याने हा विजय ऐतिहासिक ठरला होता. हा विजय केवळ एका जागेचा नसून, जनतेने त्यांच्या संघर्षाला दिलेली पोचपावती होती.
राजकीय वारसा आणि अस्तित्व :२०१९ च्या मोदी लाटेतही बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले खासदार होते. २०२४ मध्ये प्रतिभा धानोरकर यांनी हा गड केवळ राखलाच नाही, तर तो अधिक मजबुतीने जिंकून दाखवला.
संसद गाजवणारी ‘तडाखेबंद’ कामगिरी : संसदेच्या पहिल्याच सत्रात त्यांनी आपल्या आक्रमक भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी मांडलेले मुद्दे मतदारसंघातील विकासासाठी दिशादर्शक ठरले.
- शेतकरी व कामगार कल्याण :अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ९३.७६ कोटींची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- पायाभूत सुविधा : चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आणि पिंपळगाव-गडचांदूर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला.
- प्रशासकीय सुधारणा :चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, ही त्यांची मागणी सरकारने मान्य केली.
- निवडणूक आयोग निर्णय : निवडणूक चिन्हे मिळाल्यानंतरचाच खर्च उमेदवाराच्या खात्यात धरला जावा, या त्यांच्या मागणीमुळे देशभरातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला.
तळागाळातील नेतृत्व : त्या केवळ निवडून आल्या नाहीत, तर ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी सातत्याने काम करत आहेत. संसदेतही त्यांनी पहिल्याच सत्रात जनसामान्यांच्या प्रश्नांवर आपली आक्रमक भूमिका मांडली आहे
खासदार प्रतिभा धानोरकर नेतृत्वात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसची ऐतिहासिक भरारी : जिल्हात नगर परिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ७ महत्त्वाच्या नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकवून धानोरकर यांनी आपला राजकीय प्रभाव सिद्ध केला आहे. बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा, नागभीड, मूल आणि घुग्घुस या शहरांमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह बहुमताने विजय मिळवला. उमेदवारांची निवड करताना केवळ निष्ठा न बघता ‘गुणवत्ता आणि निवडून येण्याची क्षमता’ या सूत्राचा खासदार धानोरकर यांनी अवलंब केला, जो अत्यंत यशस्वी ठरला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यातील सूक्ष्म नियोजन आणि समन्वयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या विजयाने चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिभा धानोरकर यांचे नेतृत्व अधिक पोक्त आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यात त्यांना यश आल्याने, संपूर्ण राज्यात या ‘चंद्रपूर पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. नगर परिषद निवडणुकीतील या यशाने चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून समोर आला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी या निकालामुळे काँग्रेसची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे.
अविचल जिद्द आणि “डॅशिंग” नेतृत्व : पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता “मी रडणार नाही, तर लढणार” हा बाणा धरून त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना “डॅशिंग महिला लोकनेत्या” असे संबोधले जाते. आज त्या केवळ काँग्रेस पक्षाचा आधार नसून सामान्य जनतेचा आवाज बनल्या आहेत.
ध्येयवादी नेतृत्व : प्रतिभा धानोरकर यांनी अल्पकाळातच आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले की, केवळ वारसा असून चालत नाही, तर त्यासाठी लोकसंग्रह आणि कामाची तळमळही असावी लागते. यांनी मांडलेला ‘१० कलमी कार्यक्रम’ हा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प, प्रदूषण नियंत्रण, रेल्वे सुविधा आणि बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी महत्त्वाचा ठरत आहे. “लोकांचे प्रश्न सोडवणे हीच खरी ईश्वरसेवा” या विचाराने त्या सतत कार्यरत असतात.
आज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना !
![]()
करण ठाकरे, उपसंपादक, नवामार्ग न्युज नेटवर्क


