चंद्रपूर : चंद्रपूर परिसरासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून, चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या दुर्गम,आदिवासीबहुल जिल्ह्यांतील लाखो कुटुंबांसाठी नवे आशास्थान ठरणार आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी वेळेवर व सुलभ उपचार मिळणे येथे मोठे आव्हान होते. ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते २२ डिसेंबर रोजी होणारे लोकार्पण या सेवाकार्याला नैतिक अधिष्ठान देणारे आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक व्यापक होणार आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तळमळीतून, सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि दूरदृष्टीतून साकारले चंद्रपूरचे कॅन्सर हॉस्पिटल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
. चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दाखवलेली तळमळ विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत या प्रकल्पासाठी भक्कम भूमिका बजावली. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून त्यांनी हे कार्य केले. त्यांची संवेदनशीलता, चिकाटी आणि दूरदृष्टी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय असून, हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे. या पवित्र आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते प्रत्येक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या होणाऱ्या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देतो.


