बल्लारपूर तालुक्यात पावसाने दैनावस्था
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
बल्लारपूर : तालुक्यात कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून आहे. यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांची दैनावस्था केली. तब्बल १२९ टक्के पर्जन्यमान झाले. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. पिडीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बल्लारपूर येथील तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी मंगळवार (दि. ४) नोव्हेंबर रोजी बल्लारपूर तालुक्यात कोर्टीमक्ता येथील एका शेतात भात पिकांची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
. बल्लारपूर तालुक्यात भात पिकांचे एकूण सामाहिक क्षेत्र २ हजार ८५४.५४ हेक्टर इतके आहे. यामध्ये कोर्टीमक्ता, ईटोली, मानोरा, कवडजई, किन्ही, गिलबीली, मोहाळी तुकूम, कोठारी, पळसगाव आदी भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह याच पिकांवर अवलंबून आहे.यामध्ये इतर तृणधान्य ४.९0 हेक्टर व तूर ४४0.९0 हेक्टर आणि इतर कडधान्य १२.७0 असे एकूण 3313.04 हेक्टर मधील अन्नधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी जीवन जगण्याचा संघर्ष करत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसिलदार रेणुका कोकाटे (शिंदे) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज घेतला.
. बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन चे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १२१२.७0 हेक्टर इतके आहे. त्याच प्रमाणे कापूस प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र 3355.50 हेक्टर असून यावर्षी शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील निघत नाही. यामुळे शेतकरी घायाळ झाला आहे. बल्लारपूर तालुक्यात एकूण सरासरी कृषी क्षेत्र ७ हजार १९0 हेक्टर इतके असून यांपैकी ४९७९.६0 हेक्टर मधील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भवितव्याचा प्रश्न भेडसावत आहे. संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा संघर्ष थांबविण्याची मागणी जोर पकडत आहे.


