Home सामाजिक गरजू होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ‘नाते आपुलकीचे’ संस्थेची मोलाची मदत

गरजू होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ‘नाते आपुलकीचे’ संस्थेची मोलाची मदत

743

चंद्रपुर : शिक्षण हा गरिबीमुक्तीसाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे, आणि या मार्गावर असंख्य विद्यार्थी आपल्या स्वप्नांच्या उंच भरारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशाच एका होतकरू, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला ‘नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर’ तर्फे शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

.       साहिल ईश्वर धात्रक हा सिंदेवाही तालुक्यातील एका छोट्या गावातला विद्यार्थी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असून, त्याने दहावीला ९०.२० टक्के आणि बारावीला ८४.३३ टक्के गुण मिळवत उज्ज्वल शैक्षणिक प्रगती साधली आहे. सध्या तो नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये बी.ए. चे शिक्षण घेत असून स्पर्धा परीक्षांची तयारीही करत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, त्याचे वडील मोलमजुरी करून घर चालवत आहेत. साहिलच्या शिक्षणाची जाणीव ठेवत संस्थेने पुढाकार घेत १० हजार रुपयाचा मदतीचा धनादेश त्याला प्रदान केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशन नागरकर, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, सदस्य प्रा. राजेश बारसागडे, प्रा. रोहिणी निले व संस्थेच्या अनेक  मान्यवरांच्या उपस्थित सदर मदतीचा धनादेश साहिलला देण्यात आला.

.         ‘नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था’ ही संस्था आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असून, आजपर्यंत ७ लाखांहून अधिक रक्कम गरजू विद्यार्थी आणि रुग्णांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात दिली आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा ध्यास समाजासाठी प्रेरणादायी आहे.
ही सामाजिक चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी, संस्थेला दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची गरज आहे. एकत्र येऊन आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देऊ शकतो असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

error: Content is protected !!