ग्रामीण भागातील रुग्णांना एक रुपयाही न घेता देतो जेवणाचा डब्बा
लोक कलावंत बाळूची अनोखी धावपळ
रवी खाडे
चंद्रपूर : एकीकडे माणुसकी लोप पावत असताना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील लोक कलावंत बाळू लोखंडे या युवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणतं एक वर्षांपासून तों रुग्णांना व त्याचे सोबत असलेल्या नातेवाईकांना एक रुपयाही न घेता अगदी मोफत जेवणाचा डब्बा पोहचवीत खऱ्या अर्थाने माणुसकीशी भाषा जाणतो. या निःस्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे तो रुग्णांसाठी देवदूतच ठरला आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील बाळू लोखंडे हे लोक कलावंत आहेत, सद्या ते चंद्रपूर येथे राहतात. मागील 15 वर्षांपासून गावागावात ते दंडारीचे प्रयोग सादर करीत आहेत, झाडीपट्टीत ते 22 मंडळासोबत जुडलेले असून झाडीपट्टीत त्यांनी कलेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रसिक मायबाप त्यांना उत्सपूर्त प्रतिसाद देत आहे. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात बाळगून बाळू लोखंडे हे नेहमीच समाज सेवा करीत असतात. याचाच एक भाग म्हणून बाळू लोखंडे यांनी मागील एक वर्षापासून एक छोटासा उपक्रम सुरु केला आहे. त्याचं नाव आहे माहेरचा डब्बा.
. ग्रामीण भागात मोठे रुग्णालय नसल्यामुळे शहरात रुग्णांना भरती करावं लागते. भरती केल्यानंतर 4 ते 5 दिवस रुग्ण हा बरा होईपर्यंत रुग्णालया मध्ये भरती असतो. पेशंट आणि त्याच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक हे चिंतेत असतात. जेवणासाठी त्यांची धावपळ होऊ नये म्हणून बाळू लोखंडे हे स्वतः त्यांना मोफत दोन्ही वेळेच जेवण पोहचवून देतात. रुग्णालयात रुग्ण भरती झाल्याचे माहित होताच व रुग्णाच्या नातेवाईकांनी बाळूला संपर्क साधताच त्यांना जेवणाचे डब्बे पोहचून देतात. कलावंत हा दयावान असतो हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होत आहे. या त्यांच्या उपक्रमामुळे बाळू लोखंडे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
. सामान्य परिस्थिती असतानाही बाळू एक रुपयाही न घेता स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचा डब्बा पोहचवितो. बाळू च्या या कार्याला नवामार्ग न्युज पोर्टल चा सलाम !


