शेतकऱ्यांना दिलासा
शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या आंदोलनाला यश
वरोरा : सन २०२४-२५ या हंगामात अती पावसाने व अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या विरोधात शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केली होती. हे विशेष. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विमा योजनेला अखेर मंजुरी मिळाली असून आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी 100 टक्के विमा उतरविण्यासाठी कृषी व महसूल विभागाने अथक प्रयत्न घेतले मात्र जेव्हा शेतकऱ्याच्या शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा कृषी व महसूल विभाग शेतकऱ्यांना सहकार्य करण्या ऐवजी विमा कंपनीकडे बोट दाखवितात. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसून येते. हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. सन 2023- 24 व 2024 – 25 या दोन्ही हंगामात अनिश्चिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना हातात आलेले पीक गेल्याने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागले.
. मात्र शासनाकडून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसल्या जात असल्याने शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी शेतकर्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे असे म्हणत कृषी विभाग, तहसील कार्यालय, चंद्रपुर नागपुर महामार्गावर आंदोलन केली होती. तर तहसील कार्यालय वरोराच्या प्रांगणात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. शेतकर्यांच्या विविध समस्यांना घेऊन केलेल्या आंदोलनाने राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते. या आंदोलनानंतर पिकं विमा कंपनी व प्रशासनाने काही का होईना शेतकर्याच्या खात्यात पीक विमा ची रक्कम जमा केली होती. आता पुन्हा प्रतीक्षेत असलेल्या पीक विमा योजनेला अखेर मंजुरी मिळाली असून 2024-25 चा पीक विमा शेतकर्याच्या खात्यात जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तर शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्याने त्याचे शेतकर्याच्या वतीने आभार मानल्या जात आहे.


