विसापूर येथील निवासी शाळेत समता सप्ताह
बल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ऐतिहासिक कार्य केले. ही राज्यघटना भारतीयांना पिढ्यान पिढ्यांना मार्गदर्शक आहे. देशाला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी उपयुक्त आहे. समाजवादी व्यवस्थेला बळकट करणारी आहे. समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय या विचारांचे मूल्य यामध्ये सामावले आहे. सर्वच समाज घटकांना न्यायाची संधी राज्यघटनेत मांडली आहे. सामाजिक लोकशाहीचा यात समावेश आहे. आपली राज्यघटना म्हणजे मानवी कल्याणाचा जाहीरनामा होय. या जगातील दुर्मिळ ग्रंथाची जपणूक झाली पाहिजे. तो घराघरांत वाचला पाहिजे, असे प्रतिपादन विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी सामाजिक समता सप्ताह दरम्यान केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील अनुसूचित जाती / नवबौध्द निवासी शाळेत सामाजिक समता सप्ताह निमित्त जागर संविधान कार्यक्रम शनिवार ( दि. १२ ) रोजी शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती/नवबौध्द निवासी शाळेच्या मुख्याध्यापक बबीता ए. हुमने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, विद्यार्थी पालक राजू उपरे, अमरदीप पडवेकर, अभिलाष चांदेकर, संजय भगत, बी. एस. कोडापे, सहाय्यक शिक्षक आर. एम. मुरस्कर, पी. वाय. बोरकर, ए. एस. मालोदे, पि.जी.ठाकरे, यु.बी.बलके, सुरज टेकाम आदींची उपस्थिती होती.
. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. बबीता हुमने मार्गदर्शन करताना म्हणाल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्षातून संविधान देशाला दिले. यामुळे आधुनिक भारताची प्रगती झाली आहे. आज आपण ताट मनाने जगत आहात. यामध्ये सर्व धर्म सम भावाचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जि.बी. घरडे यांनी केले. संचालन अनुष वनकर यांनी केले. आभार प्रशिक खोब्रागडे यांनी मानले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


