Home चंद्रपुर जिल्हा विशेष साहेब, रात्र जागून काढली मात्र भांडे मिळालेच नाही

साहेब, रात्र जागून काढली मात्र भांडे मिळालेच नाही

1283

हजारो महिला धडकल्या वरोरा पोलीस ठाण्यात

वरोरा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत आहे. यासाठी चंद्रपुरात तीन दिवसापासून रात्र जागली मात्र भांडेच मिळाले नसल्याने वरोरा शहरात एका संस्थेकडून भांड्याचे वितरण होणार असल्याचा संदेश पाठविण्यात आल्याने महिलांनी त्या संस्थेच्या कार्यालयात गर्दी केली. आणि ही गर्दी थेट वरोरा पोलीस ठाण्यात पोहचली.

.      बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच चंद्रपूर एमआयडीसी मध्ये भेटणे सुरु आहे यासाठी महिलांनी मोठी गर्दी होत असल्याची बातमी दैनिक नवजीवन ने उघडकीस आणताच खळबळ माजली होती. चंद्रपुरात गर्दी होत असल्याने शिवराज्य संस्थेचे सचिव सुरेंद्र ढोकणे यांनी भांड्याचे संच वरोरा तुन वितरित व्हावे यासाठी कामगार आयुक्ताना निवेदन दिले. आणि चंद्रपूर येथे हेलपाट्या मारणाऱ्या महिलांना वरोरा येथे भांडे वितरित होणार असल्याची माहिती दिली. यामुळे तालुक्यातील हजारो महिलांनी गर्दी केली होती. हे लक्षात येताच उबाठा चे युवा सेना संपर्कप्रमुख मनीष जेठानी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचून अधिकची रक्कम महिला कामगारांकडून घेऊ नये असे ठणकावून सांगितले त्यानंतर अधिक चौकशी केली असता भांडे व पेटी साहित्य चंद्रपूर कामगार कार्यालयातून वाटप केले जाते वरोरा शहरात अशा कोणत्याही खाजगी संस्थेस वाटप करण्याचे काम दिले नसून महिलांची फसगत केली जात असल्याचा आरोप मनीष जेठानी यांनी केला आहे. जेठानी यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवराज्य संस्थेचे ढोकणे हे महिलांसोबत वरोरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस प्रशासनाना याची माहिती दिल्यानंतर ठाणेदार अजिंक्य तांबळे यांनी कामगार आयुक्त कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती घेत उपस्थित महिलांना समजावून सांगितले. यानंतर ढोकणे यांनी तहसीलदार वरोरा यांना बांधकाम कामगार महिलांना चंद्रपूर येथे भांड्याचे संच आणण्यात त्रास होत असल्याने वरोऱ्यातून संच वितरित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

मी शिवराज्य संस्थेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे अर्ज भरून देण्याचे काम करतो. संस्थेची रजिस्टेशनं फी 300 रुपये घेतो व त्याची पावती दिल्यानंतर त्यांचा अर्ज भरून देतो. तीन दिवसापासून महिला चंद्रपूर येथे भांडे संच आणण्यासाठी जात आहे मात्र खाली हात येत असल्याने मी कामगार आयुक्ताना निवेदन देत माझ्या कार्यालयातून भांडे संच वितरित करणार असल्याची माहिती दिली. तसें सर्व महिलांना सांगितले होते 200 रूपये शुल्क लागणार म्हणून तो मी घेत आहे.                                                                                                                                                          सुरेंद्र ढोकणे,                                                                             सचिव,                                                                         शिवराज्य संस्था वरोरा

महिला कामगारांकडून अधिकची घेतलेली रक्कम परत करावी. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. भांडे व पेटी वाटपाचे काम नगरपरिषद व पंचायत समिती यांच्याकडे देण्यात यावे.                                                                                                                                             मनीष जेठानी,                                                             उबाठा, युवा सेना संपर्कप्रमुख

नोंदणीकृत मजुरांना तालुकास्तरावर बांधकाम साहित्य वाटप करा – खा. प्रतिभा धानोरकर                                                                                                                                                     महाराष्ट्र शासनातर्फे नोंदणीकृत मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य देण्यात येते. त्या साहित्याचे वितरण एमआयडीसी येथून होत आहे. परंतु, पोर्टल च्या तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून बांधकाम साहित्याचे वितरण बंद आहे. अनेक बांधकाम मजुर जिल्हाभरातून साहित्य घेण्याकरीता रोजगार सोडून एमआयडीसी येथे उपस्थित झाले. परंतु पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याचे कारण सांगुन मजुरांना माघारी जावे लागले. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सहायक आयुक्ताशी चर्चा करुन जिल्हास्तरावरुन बांधकाम साहित्याचे वितरण न करता तालुकास्तरावर बांधकाम साहित्याचे वितरण करण्यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या.                                                                                                              कामगार विभागाच्या माध्यमातून मजुरांना वितरीत करण्यात येणारे साहित्य घेऊन जाण्याकरीता जिल्हातून महिला व पुरुष मजुर मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. काही मजुरांनी सदर साहित्य घेण्याकरीता दोन ते तीन दिवसांपासून एमआयडीसी येथील साहित्य वितरण परिसरात तळ ठोकून बसले आहे. परंतु, पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मजुरांचा भ्रमनिरास झाला. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र पाठवून तसेच, त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हातून कुठलाही कामगार साहित्य घेण्याकरीता चंद्रपूर ला येऊ नये. तसेच, बांधकाम साहित्याचे वाटप तालुकास्तरावरुन करावे अशा सुचना दिल्या. तसेच पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यास मजुरांना त्रास होऊ नये या करीता मोबाईल वर संदेश पाठवावा अशा देखील सुचना खासदार धानोरकर यांनी केल्या. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त धुर्वे यांनी सांगितले.                                                                                                                                        प्रतिभा धानोरकर,                                                                       खासदार,                                                             चंद्रपुर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्र

error: Content is protected !!