Home सामाजिक बिबी आणि जुगनाळ्यात होणार पंचायत लर्निंग सेंटर

बिबी आणि जुगनाळ्यात होणार पंचायत लर्निंग सेंटर

1101

केंद्रांसाठी प्रत्येकी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर

गडचांदूर : राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी (ता. कोरपना) आणि जुगनाळा (ता. ब्रह्मपुरी) या ग्रामपंचायतींची पंचायत लर्निंग सेंटरसाठी निवड झाली आहे. या केंद्रांसाठी शासनाने प्रत्येकी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.

.     राज्यातील एकूण ४५ ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार असून, ग्रामपंचायत पातळीवरच अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे ग्रामपंचायतींच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि गती येईल, तसेच डिजिटल साक्षरता, प्रशासकीय कौशल्ये आणि सुशासन बळकट होण्यास मदत होईल.

.    या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पुण्यातील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यात निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक सहभागी होणार आहेत.

ग्रामपंचायत स्तरावरच प्रशिक्षणाची सुविधा मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पंचायत लर्निंग सेंटरमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात आधुनिकता येईल आणि स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होईल. शासनाने यासाठी आमच्या ग्रामपंचायतीची निवड केली त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानते.                                                                                                      माधुरी टेकाम,                                                                           सरपंच,                                                                      जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी

error: Content is protected !!