वरोरा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भटाळा येथील तलावाच्या भिंतीला ठीकठिकाणी भगदाळ पडल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे वृत्त दैनिक नवजीवनने मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर प्रशासनाने तलावाच्या बांधकामाला सुरवात केली.
. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने भटाळा येथे सन 1982 मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे परिसरातील शेतकर्यांच्या शेतजमिनी सिंचनाखाली आल्या. तर गावातील काही मच्छीमार व सिंगाळा व्यवसायिकांचे कुटुंबांचा उदरनिर्वाह या तलावाच्या माध्यमातून होऊ लागला. मात्र या तलावाच्या निर्मिती पासून तलावाची साधी डागडुजी ही झाली नाही. परिणामी लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणा मुळे या तलावाला अनेक ठिकाणी भगदाड पडले. मागील वर्षी झालेल्या संततधार पावसाने तलाव ओवर प्लो झाला होता. व तलावाची भिंतच खचली होती. त्यामुळे हा तलाव कधी फुटेल हे सांगता येणार नव्हते. तलाव फुटल्यास आजू बाजूच्या परिसरातील गावांना धोका निर्माण होणार असल्याचे भाकीत दैनिक नवजीवनने दिले होते. तलाव फुटला तर भटाळा, आसाळा, कोटबाला, पाचगाव, खेमजई सह अनेक गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार होता. आता मात्र प्रशासनाने तलावाचे बांधकाम सुरू केल्याने लघु पाटबंधारे विभागाने बांधलेला तलाव पुन्हा कात टाकणार असल्याने शेतकर्यांमध्ये व गावकर्यांत आनंद व्यक्त होताना दिसत आहे.


