भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयात केले होते आयोजन
भद्रावती : विदर्भात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेतंर्गत येणाऱ्या विविध शाळा, महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात शनिवार दि 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
. या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारीवर्गाची परस्परात ओळख निर्माण होऊन स्नेह वृद्धिगत व्हावा. परस्परांच्या कार्याचा परिचय व्हावा. कर्मचाऱ्यांमध्ये ऋणानुबंध वृध्दिंगत व्हावे. त्यातून संस्थेच्या कार्याला बळकटी येऊन संस्थेची भरभराट व्हावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजू गावंडे, सदस्य सर्वश्री झेड. बी. लांबट, विजय गावंडे, मायाताई राजूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा, विवेकानंद पूर्व प्राथमिक शाळा वरोरा, विवेकानंद उच्च प्राथमिक शाळा वरोरा, अरविंद विद्यानिकेतन हायस्कूल वरोरा, विवेकानंद माध्यमिक विद्यालय मांगली, विवेकानंद माध्यमिक विद्यालय साठगांव, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती, विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील कार्यरत कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले.
. विवेकानंद महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात आयोजित या भव्य सोहळ्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर विवेकानंद ज्ञानपीठातील सर्व कर्मचारीवृंदांनी आपला परिचय देत आपले व्यक्तिमत्व व सुप्त कलागुणांना वाव दिला. पीपीटीद्वारे आपल्या शाळा महाविद्यालयातील उपक्रमांची सविस्तर माहिती आदानप्रदान केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती राखुंडे, आभारप्रदर्शन प्रा. नरेंद्र लांबट यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीने प्रचंड परीश्रम घेतले.


