Home सामाजिक आनंदनिकेतन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न

आनंदनिकेतन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न

1157

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत ग्रामपंचायत पारोधी, तालुका भद्रावती इथे संपन्न झाले. दिनांक 07 जानेवारी 2025 रोजी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ व 13 जानेवारी 2025 रोजी समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.

.      समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंदनिकेतन महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या डॉ. रंजना लाड व पारोधी गावातील ज्येष्ठ नागरिक दामोदर बोबडे उपस्थित होते. मतदार जनजागृती, प्लास्टिक व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनासाठी युवाशक्ती शिबिर ही या शिबिराची थीम ठरवण्यात आली होती. या अनुषंगाने सात दिवस चाललेल्या या शिबिरात यावर्षीच्या थीमला अनुसरूनच बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील अनुसया काळे आणि टीम यांच्या प्लास्टिक व्यवस्थापन व मुजावर अली व रोशन इरपाते यांचे सायबर क्राईम व मोबाईलचे दुष्परिणाम या लेक्चर्सना रासेयो स्वयंसेवकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

.        मतदार नोंदणी व जनजागृती या विषयावर प्रा. डॉ. तक्षशिल सुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्याचा काळ यावर विजय तांबे यांनी प्रकाश टाकला. प्रा. भालचंद्र लोडे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाच्या टीम ने विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले व गावकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. 12 जानेवारीच्या पशूवैदकीय शिबिराला व आरोग्य शिबिरालाही गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. खूप मोठ्या संख्येने गावकरी या दोन्ही शिबिराला उपस्थित होते हे महत्वाचे. बौद्धिक सत्रासाठी आलेल्या सर्वच वक्तांशी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला याचे विशेष कौतुक. पारोधी गावातील महिलांसाठी विशेष खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याला ही महिलांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

.      ‘श्रम ही श्रीराम हमारा’ हे आनंदवनाचे ब्रीदवाक्य. रोज सकाळी होणाऱ्या श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमाचे महत्त्व रुजवले गेले. या सात दिवसात विद्यार्थ्यांनी पारोधी गावात रस्ता रुंदीकरण, गावातील साफसफाई, कच्चा रस्ता पक्का करणे, स्वच्छता अभियानातून प्लास्टिक गोळा करणे, पारोधी शाळेत होणाऱ्या बीट स्तरीय खेळांच्या स्पर्धेसाठी ग्राउंड तयार करणे अशी विविध कामे केली.

.     विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी रात्री विद्यार्थ्यांचा व पारोधी वासियांचा सांस्कृतिक कार्यक्रमही शिबिर स्थळी आयोजित केला होता. रोज रात्री चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाचा विद्यार्थी आशिष माणूसमारे यांचे कीर्तन विशेष ठरले. लोकप्रिय सप्त खंजिरी वादक कीर्तनकार भाऊ थुटे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन असेच अप्रतिम. विलास चौधरी निर्मित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि अर्थातच आनंदवन निर्मित ‘स्वरानंदनवन’ हा ऑर्केस्ट्रा पारोधी वासियांसाठी व स्वयंसेवकांसाठी पर्वणीच ठरला.
जागर, चिंतन, व्यायाम, दिंडी, श्रमदान, भौतिकसत्र, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशी दिनचर्या विद्यार्थ्यांनी सातही दिवस उत्साहाने व दिलेल्या वेळातच पार पाडली हे महत्वाचे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रोज सकाळी होणाऱ्या दिंडीमध्ये पारोधी गावातील सर्व भजन मंडळींची उपस्थिती अतिशय महत्त्वाची राहिली. सर्व महिला रोज उत्साहाने दिंडीमध्ये सहभागी होत असत.

.        समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. रंजना लाड यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे व्यासपीठ तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचं मत व्यक्त केले. पारोधी गावातील ज्येष्ठ नागरिक दामोदर बोबडे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता यशाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक गंगाधर बोढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राकेश घरत, मनोज आसुटकर यांनी शिबिराबाबत आपले मत व्यक्त केले.

.    आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुकही केले. पारोधी ग्रामपंचायत मधील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व खूप मोठ्या प्रमाणात गावकरी ही याप्रसंगी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे व गावकऱ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. सात दिवस चाललेल्या या शिबिरातील उपक्रमांचे अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी प्रा. मोक्षदा नाईक यांनी केले. याच कार्यक्रमात हर्षाली नासरे, मनस्वी
खामनकर, साहिल मंगाम यांनी शिबिराबाबतचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मारुती मुंडे यांनी तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड यांनी आभार मानले.

.         या संपूर्ण शिबिरासाठी महारोगी सेवा समिती चे सचिव डॉ.विकास आमटे, समस्त आमटे परिवार, विश्वस्त मंडळ आनंदवनवासी यांचा मदतीचा हात प्रथम दिवसापासून शिबिराला लाभला. सर्वच कार्यक्रमांना पारोधी वासियांच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीमुळे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. समारोपीय समारंभाच्या वेळेस गावकऱ्यांची खूप मोठी उपस्थिती कार्यक्रम स्थळी होती. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांवर फुले उधळीत त्यांनी जो निरोप दिला त्यामुळे शिबिर स्थळी सर्व वातावरण भाऊक झाले. विद्यार्थ्यांचा निरोप घेताना गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

.      प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने, सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मोक्षदा नाईक, प्रा.सुरेश राठोड व प्रा. मारुती मुंडे यांचे यशस्वी नियोजन, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहाय्य, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसाद यामुळे शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले.

error: Content is protected !!