प्राचार्य डॉ. पि. एम. काटकर यांचे प्रतिपादन
विसापूर येथे रासेयो शिबीराचे उद्घाटन
बल्लारपूर : विद्यार्थ्यांत विविध कलागुण अवगत असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास जागविण्यासाठी रासेयो शिबीर महत्वाची भूमिका बजावते. ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देते. यातून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली जाते. रासेयो शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व घडविण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी विसापूर येथील शिबिराच्या उद्घघाटन प्रसंगी केले.
. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘डिजिटल साक्षरतेसाठी भारतीय युवाशक्ती’ या विषयावर सात दिवसांचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराचा उद्घघाटन समारंभ राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, डॉ. पुष्पांजली कांबळे, डॉ. ऊषा खंडाळे, डॉ. कुलदीप गौंड, डॉ. वंदना खनके, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. पुरूषोत्तम माहोरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी भूषविले.
. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. काटकर यांच्या हस्ते रासेयोच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून सात दिवसाच्या रासेयो शिबीराचे उद्घघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसक तत्वांने क्रांती घडविली.ग्रामीण संस्कृतीशी नाते जोडण्याचा संकल्प केला. याच अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित आहे. स्वामी विवेकानंदांनी मानवी जीवनात ऐक्याचा विश्वधर्म धर्म सांगितला. यांच्या कार्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे समन्वयक डॉ. कुलदीप गौंड यांनी करून शिबीर आयोजनाची भूमिका विशद केली. संचालन डॉ. पुरूषोत्तम माहोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजकुमार बिरादार यांनी केले. यावेळी शेकडो शिबीरार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


