पिपरी येथील आवारी परिवाराचा आदर्श
प्रथा परंपरेला दिला फाटा
राजुरा : वयाची शंभरी सुखरूप पार करून १०६ वर्ष जीवन जगणारे पिपरी (धानोरा) येथिल नामदेव संभा आवारी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांच्या गंगापूजन कार्यक्रमा निमित्त इतर प्रथा, परंपरा विधीला फाटा देत आजनगाव येथिल ह. भ. प. माणिक रोकडे महाराज यांच्या उपस्थितीत दत्ता मसे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून श्रद्धांजली अर्पण केली.
. यावेळी माणिक रोकडे महाराज यांनी सांगितले की, आवारी परिवाराने संपूर्ण जीवन आई वडिलांच्या छत्र छायेखाली घालविल्यानंतर त्या माय पित्याकडून मिळालेल्या संस्काराचे बीज आपल्या परिवारात रोवून आदर्श परिवार घडविण्याचे काम केले आहे. सहा वर्षांपूर्वी आई गंगाबाई यांचे निधन झाले, आता नुकतेच नामदेव आवारी यांचे वृद्धपकाळाने वयाच्या एकशे सहा वर्षांनी निधन झाले. नामदेव आवारी यांचे दोन मुले सुभाष आणि गणपत आवारी यांनी परंपरागत पद्धतीने सोपस्कार पार पाडल्यानंतर समाजाला उपदेश देण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार व गाववासियांच्या उपस्थितीत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून श्रद्धांजली वाहिली. ह. भ. प. दत्ता मसे यांनी सांगितले की, आजची पिढी “ज्या आई-वडिलांनी मुला मुलींचा सांभाळ केला, ते मूल मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई- वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. ते अनाथांकडून जाणून घ्या. आई – वडिलांची अभिमानाने मान उंचावेल असे कर्तृत्व गाजवा, असे आव्हान केले.
. यावेळी ह. भ. प. माणिक रोकडे महाराज, दत्ता मसे, रामचंद्र गोहोकार, भुवन चौधरी, सुधाकर गोरे, वसंता बोबडे, हेमंत तेजने, समीर महाराज, भाऊराव चतुरकर, शंकर थेरे, शंकर पाचभाई, गणपत आवारी, सुभाष आवारी, आवारी परिवार व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


