राज्यभरातील चर्मकार बांधवांचा न्यायासाठी एल्गार
आपपल्या सोईने मिळेल त्या वाहनाने प्रयाण
विसापूर : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी चर्मकार बांधवांच्या प्रलंबित न्याय मागण्या सोडविण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवार ( दि. १) आक्टोंबर २०२४ रोजी मोर्च्याची हाक दिली आहे. राज्यभरातील चर्मकार बांधवांचा एल्गार सरकारला जड जाणार असून मिळेल त्या वाहनाने मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबई ला प्रयाण करते झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून देखील चर्मकार बांधव मुंबई येथील मोर्च्यासाठी रवाना झाले. ही माहिती विदर्भातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संबा वाघमारे यांनी दिली आहे.
. राज्यातील चर्मकार बांधवांच्या प्रलंबित न्याय मागण्या शासन दरबारात पडून आहे. मात्र,याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी राष्ट्रीय चर्मकार महासंघाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे. यासंदर्भात चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात २१ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील चर्मकार बांधवांची निर्धार बैठक घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष माधवराव गायकवाड, विदर्भातील अध्यक्ष संबा वाघमारे, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे आदी पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवात चैतन्य निर्माण करून समाजात होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्यासाठी मोर्चा हाच मार्ग असल्याची जाणीव करून दिली आहे. याला समाज बांधवांनी प्रतिसाद दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील चर्मकार बांधव मुंबई येथील मोर्च्यासाठी रवाना झालेत. मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रयाण केले आहे. हा एल्गार यशस्वी होणार असल्याचा विश्वास संबा वाघमारे यांनी व्यक्त केला.
. चर्मकार समाजातील विविध प्रलंबित मागण्या व संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ द्वारा समाज बांधवांच्या कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी कर्ज प्रकरणे तातडीने मंजुर करावी.आदी मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चर्मकार बांधव बस,ट्रैवल आणि रेल्वेने मुंबई ला रवाना झाली आहे, असे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे यांनी म्हटले आहे.


