पानंद रस्त्याच्या नालीने घेतला बैलाचा बळी

21

विसापूर शेतशिवारातील घटना

ऐन शेती हंगामात शेतकऱ्याचे नुकसान

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर शेतशिवार पुराने जलमय झाले होते. पूर ओसरल्यावर शेतकरी कामाला गेला. बैलबंडीने शेतात जात होता.दरम्यान बैलाने बंडीसह पानंद रस्त्याच्या खोल नालीत पडली.पानंद रस्त्याच्या खोल नालीने बैलाचा बळी घेतला. ही घटना विसापूर शेतशिवारात आज सोमवारी दुपारी २ वाजता दरम्यान घडली. यामुळे ऐन खरिप हंगामात जोडीतील बैल दगावल्याने शेतकऱ्याचे अवसान गळाले आहे.

.       विसापूर येथील शेतशिवारात चंद्रकांत येवले यांच्या शेतापासून मारोती मंदिर रिठ दरम्यान एकमेव पानंद रस्त्याचे थातूरमातूर बांधकाम केले. कंत्राटदाराने रस्ता बांधकाम करताना नियमाला डावलून खोल नाली खोदली.याच रस्त्याने ये – जा करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. बैलबंडीने शेतात कामाला जाताना अडचण सहन करावी लागते. अचानक बैलबंडी नालीत पडली. शेतकऱ्याने प्रयत्न करुन देखील बैलाचा जीव वाचवू शकला नाही. बंडीच्या धुरीचा बैल घटनास्थळी दगावल्याने शेतकऱ्याचे अवसान गळाले. जोडीतील बैल दगावल्याने शेतकरी विलास टोंगे याचेवर ऐन खरिप हंगामात मोठे संकट आले आहे. संबंधित कंत्राटदाराने पिडीत शेतकऱ्याचे नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

.       वर्धा नदीच्या पुराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कधी दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती या शिवाय शेतमालाचे पडलेले भाव हा संघर्ष शेतकऱ्याचे नशिबी आहे. अशातच जोडीतील बैल अचानक दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. विलास टोंगे या शेतकऱ्यावर मोठा आघात झाला आहे. कंत्राटदार व पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने समन्वयाने मार्ग काढून पिडीत शेतकऱ्याला दिलासा म्हणून मदतीचा हात देण्याची मागणी, परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.