सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचे सावट

52

वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी चिंतेत

कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज

हातात आलेले पीक जाण्याची भीती

रवी खाडे
 चंद्रपूर : मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वरोरा भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाने आक्रमण केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन पीक फुलरा अवस्थेत असताना हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. याकडे कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.

.      वरोरा भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीन व कापूस पीकाची लागवड करतात. मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व येलो मोझॅक रोगाने हातात आलेले सोयाबीन चे पीक पूर्णतः नष्ट झाले होते. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट बिघडले होते. आता पुन्हा या येलो मोझॅक रोगाचे भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी रमेश तिखट यांच्या खंडाळा रिठ येथील 10 एकर शेतातील सोयाबीन चे पाने पिवळी पडली आहे. अख्खा प्लाट च पिवळा पडल्याने परिसरातील शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा रोग नियंत्रणात आला नाही तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कृषी विभागाने तात्काळ मोका तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी शेकऱ्यांकडून केली जात आहे.

पीक विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर नॉट रिचेबल                                                                                                                         प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी शासनाच्या एक रूपया विमा संरक्षणाचा लाभ घेतला आहे. मागील वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा देत बळीराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच कोट्यवधी रुपये प्रीमिअम विमा कंपनीला भरलेला आहे. सोयाबीन पिकांवर यलो मोझॅक रोगाने आक्रमक करून पिकांचे नुकसान केले आहे. आता विमा कंपनीने भरपाई देणे क्रमप्राप्त आहे. शासनाने विम्याचा हप्ता भरलेला आहे. त्यापोटी मिळणारी भरपाई शेतकऱ्याला मिळवून दिल्यास ती खऱ्या अर्थाने मदत ठरणार आहे. पीक विमा कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवायचे आहे. यासाठी विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर वर शेतकरी फोन करतात मात्र विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर लागतच नाही.                                                  कृषी व महसूल विभागाने तात्काळ मोका तपासणी करावी                                                                                                          मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचे आक्रमण झाले आहे. या रोगावर तात्काळ नियंत्रण आणले नाही तर हातात आलेले पीक उध्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. आधीच डबघाईस आलेला शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. यामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून उपाययोजना कराव्या. तसेच पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार करण्याची वाट न बघता वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोका तपासणी करावी व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून द्यावा.                                                                                                                                                                                     नरेंद्र जीवतोडे,                                                                         जिल्हाध्यक्ष,                                                              शेतकरी उत्पादक कंपनी चंद्रपूर