ग्राम सभेमध्ये विविध विषयावर झाली चर्चा
सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या वासेरा येथे नुकतीच गाव विकासात्मक विविध विषयासंदर्भात ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पुनर्गठन करून संजय कापकर यांची एकमताने अविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
. ग्राम पंचायत वासेरा येथील ग्रामसभा २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली. मात्र कोरम पूर्ण झाला नसल्याने ग्रामसभा तहकूब करून ती सभा ६ सप्टेंबर रोजी ग्राम पंचायत चे आवारात सरपंच दिलीप मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. विषय सूचीनुसार २०२५-२६ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यास मंजुरी देणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती पथावर असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाज पत्रकाला मंजुरी देणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करणे, इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी चार व्यक्तींचे नाव सुचविण्यात आले. मात्र तीन जणांनी आपले नाव मागे घेऊन एक मताने गुरुदेव भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कापकर यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत सरपंच दिलीप मेश्राम, उपसरपंच महेश बोरकर, ग्राम विकास अधिकारी हरिहर गुरनुले, ग्राम पंचायत सदस्य तथा गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.