पुरस्कार प्राप्त शिक्षक महेंद्र खोब्रागडे यांनी केल्या भावना व्यक्त
सिंदेवाही : दिड दशकाच्या अथक, अविरत व प्रामाणिक कष्टानंतर आपल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक झाले. यामुळे कृतार्थतेची भावना मनामध्ये दाटून येत आहे. सुख व दुःखाने नटलेलं आयुष्य हे खरंच सौंदर्यपूर्ण आहे. फक्त ते कष्टांनी सजवावे लागते. प्रत्येक दिवस हा सजगतेने व उत्पादकतेने घालविण्यासाठी उत्तम आरोग्याने साथ दिली. त्यामुळे त्याग आणि समर्पणाने कर्तव्य पूर्ण करत आल्याने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होता आल्याच्या भावना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचनभट्टी येथील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक महेंद्र खोब्रागडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी कर्मवीर कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचनभट्टी येथील शिक्षक महेंद्र खोब्रागडे यांना आदर्श शिक्षक म्हणून शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र देऊन सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या गौरवाच्या क्षणांमध्ये कित्येकांचे मोलाचे सहकार्य व आईवडील, पत्नी, गुरूजन, आणि जन्म गावातील मित्रमंडळी यांचे विशेष योगदान आहे.
. या अभिमानास्पद क्षणी सिंदेवाही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी विभा तीतरे, गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, बालपणीचे गुरूजी व सध्याचे कर्तबगार केंद्रप्रमुख तेलकापल्लीवार, केंद्राचे केंद्रप्रमुख वासेकर, शाळेचे मुख्याध्यापक विजयानंद लोखंडे, आधारस्तंभ व मार्गदर्शक सुरेश राऊत, शाळेतील सहकारी शिक्षक लाकडे, डोंगरवार, नेवारे, शेख, कापगते व केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शा. व्य. स. अध्यक्ष मनोज हनवते व सर्व सदस्य, ग्राम पंचायत सरपंच विद्या खोब्रागडे तथा समस्त ग्रामस्थ नाचनभट्टी, यांनी अभिनंदन केले आहे.