परंपरेचा वारसा सांभाळत मातीच्या गोळ्यातून कुंभार बांधव साकारतोय ” देवत्वाचा” आकार

13

(महेंद्र कोवले)
   सिंदेवाही : श्रावण महिना आला की, सण, उत्सवाची रेलचेल सुरू होते. श्रावण मासातील महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी . महाभारतातील मुख्य सूत्रधार असलेले श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यात येतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वीपासून कुंभार बांधव कामाला सुरुवात करून कान्होबाची मूर्ती, बाप्पाची मूर्ती, त्यानंतर दुर्गा, शारदा, अशा मुर्त्या तयार करून आपला परंपरागत वारसा सांभाळत कुंभार बांधव मातीच्या गोळ्याला देवात्वाचा आकार देत आपल्या उदरनिर्वाह साठी परिश्रम करीत असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यात दिसून येत आहे.

.      सिंदेवाही तालुक्यात गडबोरी, तसेच सिंदेवाही येथे कुंभार बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे मातीला आकार देऊन मडके तयार करणे. मात्र अलीकडे ” फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. हे शब्द मातीतून अतिशय कुशलतेने आपल्या कलाविष्करातून विविध रूपे देणारा कुंभार बांधव परंपरागत व्यवसाय वृद्धिंगत करून अनेक मुर्त्या तयार करीत आहेत. फिरत्या चाकावर माठ तयार करणारा कुंभार बांधव मातीतून आता देवत्वाला आकार देण्याचे काम करीत आहे.

.      शिल्पकारामध्ये मातीचे महत्व खूप मोठे आहे. गडबोरी तथा सिंदेवाही येथील कुंभार समाजातील प्रतिभावंत कलावंत पिढ्यानपिढ्या मातीत हात घालत आहेत. याच मातीतून श्रीकृष्णाची मूर्ती, गणेशाची मूर्ती, शारदा देवी, दुर्गादेवी, लक्ष्मीची मूर्ती, इत्यादी मातीचे देव बनवून त्यांचे पूजन करण्यास मानवजातीला प्रवृत्त केले आहे. कोणत्याही धातूची शिल्पकृती बनविण्यासाठी प्रथम मातीचा उपयोग केला जातो. मातीला पाहिजे तसा आकार दिला जातो. कलाविष्काराची आवड व निवड या दोन्ही बाबीचा मिळालेला वारसा जपत घरातील मातीला आकार देणारे आईवडील यांचे अनुकरण करून नैसर्गिक रूपाने मूर्तीला आकार देण्याची कला अवगत झाली. चाकावरती माठ तयार करणे, तसेच मूर्ती बनविण्याचा वारसा पिढ्यानपिढ्या जपला जात आहे. आता मूर्तीसाठी माती मिळणे दुरापास्त झाले आहे. विशिष्ट मातीची किंमत १००० ते २००० दरम्यान झालेली आहे.

.      कुंभार बांधव जेमतेम परिस्थितीत जीवन जगत आहे. वर्षभर मातीला चाकावर आकार देत उदरनिर्वाहाचे जीवनचक्र सुरू आहे. अगदी लहान मुलापासून ते आबाल वृद्धा पर्यंत घरची सगळीच मंडळी मूर्ती घडविण्यात व रंग देण्यात तरबेज आहेत. गणपतीची मूर्ती असो की, दुर्गादेवीची मूर्ती असो. हुबेहूब मूर्ती तयार करण्याच्या त्यांच्या कलेला तोड नाही.