तान्हा पोळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा

472

विविध संदेश देत चिमुकल्यानी साकारल्या विविध वेशभूषा

चिमुकल्या शेतकऱ्यांना मिळाले आकर्षक बक्षिसे

चंद्रपूर : बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा होतो तो लहान मुलांचा तान्हा पोळा. या तान्ह्या पोळ्याचे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आयोजन केले गेले होते. बालमंडळींनी आपले लाकडी नंदी फुलांनी सजवून आणले होते, तर ही मुलेही विविध वेशभुषेत सजून आली होती. यावेळी तान्हा पोळ्याच्या माध्यमातून बालगोपालांनी विविध सामाजिक संदेशही दिले.

.       तान्हा पोळा हा बालगोपाळांचा जिव्हाळ्याचा सण आहे. जिल्ह्यातही तान्हा पोळ्याच्या ठिकाणी विविध तर्हेच्या वेशभूषा करून मुलांद्वारे सामाजिक संदेश दिले गेले. दीड दोन वर्ष्यांच्या मुलांसह 10 ते 11 वर्षांची मुलांनीही आपले सजवलेले नंदी घेऊन एकत्रित येत हा सण साजरा केला.

.       तान्हा पोळा या दिवसची बालगोपाल वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी विविध ठिकाणी पोळ्याचे आयोजन केले जाते. आकर्षक नंदी, वेशेभूषा, उत्तम संदेश देणाऱ्या मुलांना बक्षिसे दिली जातात. हे बक्षीस मिळविण्यासाठी मुलांसह पालक देखील मुलांच्या आणि त्यांच्या लाकडी नंदीच्या सजावटीच्या तयारीला लागतात.

.       सर्वांपेक्षा माझा नदी कसा वेगळा दिसेल यासाठी प्रत्येकजण प्रयत्नरत असतो. कोणी शेतकरी, तर कोणी मराठमोडी लुगडं परधान करून सजून येतात. आता हा तान्हा पोळा सामाजिक संदेश देणारे स्थान झाले आहे. झाडे लावा, बेटी बचाव, सृष्टी स्वच्छ ठेवा, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण बचाव असे विविध संदेश घेऊन या तान्हा पोळ्यात बच्चेकंपनी येत असते. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्गही येतो. परीक्षकांच्या माध्यमातून उत्कृष्ट, नंदी, वेशभूषा, स्लोगन यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक दिले जाते तर इतर मुलांना चॉकलेट, बिस्कीट, शालेय संच आणि बोजारा म्हणून 10 रुपये तर काही ठिकाणी इतर भेटवस्तू देऊन या मुलांचा उत्साह वाढविला जातो. पोळा सुटल्यावर ही मुले त्यांच्या घरी जातात, तिथे त्यांचे औक्षवन केले जाते आणि नंतर परिसरात घरोघरी जाऊन ही मुले बोजारा मागतात. अशाप्रकारे या तान्हा पोळ्या निमित्त उत्साह साजरा करून सामाजिक संदेश दिला जातो.