अंधाराचा फायदा घेत वन्य प्राण्यांचा “कारवा” गावात धुमाकूळ

9

मागील दोन महिन्यापासून गावातील वीज पुरवठा बंद 

सिंदेवाही : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या आणि सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले “कारवा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले असून मागील दोन महिन्यापासून गावातील सर्व वीज पुरवठा खंडित झाला असल्याने गाव पूर्णतः अंधाराच्या खाईत गेला. याच अंधाराचा फायदा घेत वाघ, बिबट यासारखे वन्य प्राणी गावात घुसून धुमाकूळ घालत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने रात्रीची गस्त करून गावकऱ्यांना वन्य प्राण्यापासून संरक्षण द्यावे. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

.      सिंदेवाही तालुक्याच्या ठिकाणापासून ३० किलोमिटर अंतरावर असलेल्या कारवा या अतिदुर्गम गावात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. ग्राम विकासासाठी गावात ग्राम पंचायत कार्यालय असून ते केवळ शोभेची वास्तू झालेली आहे. गावात कोणताही रोजगार उपलब्ध नाही. गावाच्या चारही बाजूने घनदाट जंगलाने वेढा दिलेला आहे. तसेच मागील दीड दोन महिन्यापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने गवतबंशराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा गावात चांगलाच धुमाकूळ सुरू असून सायंकाळ होताच गावात बिबट सारखे हिंस्त्र प्राणी गावात घुसून जनावरांना ठार करीत आहेत. मागील दोन दिवसात विकास राऊत यांच्या घरात घुसून बिबट्याने शेळी ठार केली.

.      तसेच धनराज कोसरे यांची गाय सुद्धा वाघाने ठार केली. वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा हा झरी, कोळसा, या गावावरून झालेला असल्याने गावातील वीज पुरवठा नेहमी खंडित असतो. याचा फायदा घेत वन्य प्राण्यांचा गावात मुक्त संचार सुरू असून गावात वन्य प्राण्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने गावात गस्त वाढवून गावात सुरक्षा प्रदान करावी. अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.