मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात 2 लक्ष 70 हजार अर्ज प्राप्त

25

Ø  तालुका स्तरावर वॉररुम कार्यान्वित

चंद्रपूर : मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात आजपर्यंत 2 लक्ष 70 हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच 27 जुलैपासून ऑनलाईन अर्ज तपासणीचे काम सुरू झाले असून प्रत्येक तालुका स्तरावर वॉररूम तयार करण्यात आली आहे. यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आाहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हे या योजनेच्या कार्यप्रणालीवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.

अर्जदारांसाठी सुचना : 1) ज्या यंत्रणांनी ऑफलाईन अर्ज जमा केले आहेत त्यांनी तातडीने अर्ज ऑनलाईन करावे. अर्जदारांनी आपला अर्ज ऑनलाईन असल्याची खात्री करावी. यासाठी अर्ज ऑनलाईन झाल्याचा एसएमएस आला की नाही हे तपासावे. ज्यांना असा एसएमएस आला नसेल त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा. 2) अर्जाची तपासणी होऊन अर्ज मंजूर झाला असेल तर त्याबाबत अर्ज मंजूर झाल्याचा एसएमएस अर्जदाराच्या मोबाईलला येणार आहे. ज्या अर्जदाराचे अर्ज काही कारणाने नामंजूर झालेले असेल अशा अर्जदारांना याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. 3) अर्ज नामंजूर झाल्याची कारणे ज्या मोबाईल मधून अर्ज भरला असेल तेथे दिसून येईल. अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी अर्जदारास असणार आहे. त्यामुळे अर्जदाराने अशा अर्जातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करून अर्ज सबमिट करावा, ही संधी एकदाच असून त्यानंतर अर्ज कायमचा बाद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.