संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

27

चारगाव येथील प्रकार

एकाच शिक्षकांवर ४ वर्गाचा भार

शिक्षकांसाठी केले रस्त्यावर उतरून आंदोलन

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव (बडगे) येथे मागील अनेक दिवसापासून शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले. तर शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन केले असल्याने शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

.        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव येथे १ ते ४ पर्यंत वर्ग असून या शाळेत २८ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. या शाळेत एकूण चार वर्ग असल्याने चार वर्गाना चार शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून या शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन कमिटीने अनेकदा शिक्षण विभागाला पत्र व्यवहार करून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र विभागाने शाळा व्यवस्थापन समितीच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे.

.        शाळेतील कार्यरत शिक्षक हे वैद्यकीय रजेवर असल्याने सदर शाळेत कोणतेही शिक्षक नसल्याने पळसगाव जिल्हा परिषद शाळेमधून एक शिक्षक प्रभारी म्हणून चारगाव शाळेत पाठविण्यात येत होते. मात्र ते शिक्षक सुद्धा कधी यायचे, तर कधी बँकेचे, किंवा कार्यालयीन काम काढून सिंदेवाहिला निघून जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामस्थ यांनी गट शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहून सोमवार पर्यंत शाळेला दोन शिक्षक दिले नाही तर शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.

.        मात्र तरीही शिक्षण विभागाने पत्राला गांभीर्याने घेतले नाही. आणि सोमवारी शाळेत शिक्षक पाठविले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षकांची मागणी करीत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे वाहनांची वाहतूक खोळंबली होती. अखेर शाळेचे केंद्र प्रमुख तेलकापल्लिवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगण्यात आले.