विजेच्या धक्क्याने 10 म्हशींचा मृत्यू

50

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील घटना

विद्युत तार चोरीच्या प्रकरणात तार होती लोंबकळत

बल्लारपूर : बल्लारपूर वन परीक्षेत्रातील कारवा जंगल परिसरात बल्लारपूर येथील दूध उत्पादकांच्या म्हशी वैरण खाण्यासाठी सोडल्या होत्या. या परिसरातून ११ केव्ही चा विज खांबाची विज पुरवठा लाईन गेली आहे. ही लाईन बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी विज तारा कापल्या होत्या. दरम्यान त्या ताराचा स्पर्श जिवंत ताराशी आला. याच वेळी म्हशी जंगलात चरण्यास आल्या. जिवंत विज प्रवाहातील तारांशी स्पर्श झाल्यामुळे १० म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आली.

बल्लारपूर येथील देवेंद्र यादव, धुर्व यादव, रोशन पाल व विनोद कैथवास यांच्या मालकीच्या जवळपास २० ते २५ म्हशीचा कळप जंगलात चरण्यास गेला. कारवा जंगल दरम्यान म्हशी वैरण खात असताना जिवंत विज तारेच्या संपर्कात आल्या. यामुळे तब्बल १० म्हशी विजेच्या करंटमुळे जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती देवेंद्र यादव यांनी विज वितरण कंपनीकडे केली. विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. जंगलातून ११ केव्हीची विज लाईन गेली आहे. ती बंद आहे. त्या लाईन वरील विज तार चोरण्याच्या उद्धेश्याने अज्ञात चोरांनी तारा कापल्या. त्या तारा जिवंत विज तारेवर पडल्या. त्यामुळे लोंबकाळत खाली आल्या. त्या जिवंत तारेशी स्पर्श झाल्यामुळे १० म्हशीचा मृत्यू झाला. यामध्ये मौलाना आझाद वार्डातील धुर्व यादव यांच्या तीन, संतोषी माता वार्डातील रोशन पाल यांच्या सहा आणि विनोद कैथवास यांच्या एका म्हशीचा समावेश असल्याची माहिती आहे. यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विज वितरण कंपनीने नुकसान ग्रस्त म्हशीच्या मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.