विहिरीत विषारी पदार्थ टाकून पाणी केले दूषित

63
  • बल्लारपूर तालुक्यातील कवडजाई येथील प्रकार 
  • अज्ञात आरोपी विरुद्ध कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील कवडजाई येथील एका व्यक्तीच्या अंगणातील विहिरीत कोणीतरी अज्ञात इसमाने विहिरीच्या पाण्यात विषारी द्रव्य टाकून दूषित केली.हा प्रकार २८ जून रोजी सकाळी उघडकीला आला.याप्रकरणी कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.          बल्लारपूर तालुक्यातील कवडजाई येथील रोशन हनुमान ढोंगे यांच्या घराच्या अंगणात पाण्याची विहीर आहे. ही विहीर २१ फुट खोल असून ४ फुट रुंदीची आहे. या विहिरीच्या पाण्याच्या उपयोग ढोंगे कुटुंब व गावातील अन्य लोक देखील करून घेत आहे.मात्र २७ जुनच्या रात्री कोणातरी अज्ञात व्यक्तीने विहिरीच्या पाण्यात विषारी द्रव्य टाकून दूषित केल्याचा प्रकार सुरेंद्र ढोंगे यांच्या लक्षात २८ जुनच्या सकाळी आला.यामुळे ढोंगे कुटुंबियांना जबर धक्का बसला.विहिरीतील संपूर्ण पाणी फेसाळल्याचे व पांढरे दिसू लागले. विहिरीतून पाणी काढले असता,त्या पाण्याला उग्र वास येत असल्याचे दिसून आले.

.             या अकल्पीत घटनेची माहिती रोशन ढोंगे यांनी कोठारी पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती होताच कोठारीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विहिरीतील पाणी विषारी पदार्थ टाकून दूषित केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि च्या कलम २६८,२७७ व २८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कोठारी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष बोरकर करत आहे.